विधान परिषदेचे कल फिरले

कुठे मविआकडून सत्ताधार्‍यांना धक्का, तर ‘या’ जागांवर महायुती आघाडीवर

मुंबई /27 ऑक्टोबर  :  राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळपासून सुरू आहे. या मतमोजणीमध्ये सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी बरेच उमेदवार रिंगणात असल्याने झालेल्या विभाजनामुळे दुसर्‍या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मतमोजणीमध्ये रात्री उशिरापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये पाच पैकी तीन जागांवर सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे. येथे पहिल्या फेरीत अभिजित वंजारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र दुसर्‍या फेरीत भाजपाचे सुधाकर कोहळे यांनी मुसंडी मारली असून, त्यांनी आघाडी घेतली आहे. येथे अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी मिळवलेली लक्षणीय मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
तर अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे आतापर्यंतच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये 8,162 मते घेत आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे 4,688 मते घेत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4,668 मते मिळाली असून त्यांना पोहरेंच्या तुलनेत अवघे 20 मते कमी आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. शिवाय दुसर्‍या पसंतीची मते निर्णायक ठरणार आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे. प्रतापसिंह पाटील यांना 27 हजार 994 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांना 20 हजार 116 मते मिळाली आहेत. येथे अपक्ष रविराज साबळे 7 हजार 424 मते घेत निवडणुकीत चुरस निर्माण केलीआहे.तर पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाचे कौस्तुभ गावडे यांनी आघाडी मिळवली आहे. येथे शिंदेसेनेचे सचिन सानप, तसेत रासपचा पाठिंबा असलेले दत्तात्रय सावंत यांनाही लक्षणीय मते मिळत आहेत. मात्र काँग्रेसचे जयंत आसगावकर मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. तसेच सर्वांचं लक्ष लागलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात 2 लाख 26 हजार 224 मते वैध ठऱली आहेत. आता विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा जाधव देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाच्या स्मिता जाधव ह्या पिछाडीवर पडल्या आहेत.

Back to top button