ओडिशासह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली/26 ऑक्टोबर ; बंगालच्या उपसागरात अर्णव चक्रीवादळाचा जोर वाढणार असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. ते 28 ऑक्टोबरच्या सकाळी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.यामुळे केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळाचे केंद्र सकाळी 5:30 वाजता बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर होते. ते विशाखापट्टणमच्या पूर्व-आग्नेय दिशेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर होते आणि ताशी 15 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत होते.सोमवार मध्यरात्रीपर्यंत वादळाची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची आणि मंगळवारपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीला ते मंगळवार दुपारपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वार्याचा वेग ताशी 115-125 किमी राहण्याची शक्यता असून, वार्याचे झोत ताशी 140 किमी पर्यंत पोहोचू शकतात.
यामुळे बंगाल, झारखंड आणि बिहारमध्येही पावसाची शक्यता आहे. अर्णव चक्रीवादळाचा प्रभाव पूर्व किनारपट्टीच्याराज्यांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडेही पसरू शकतो.या पार्श्वभूमीवर, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अधिकार्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरफ यांची पथके तैनात करण्यात आली असून, अतिरिक्त कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलानेही आपली बचाव आणि मदत पथके सज्ज ठेवली आहेत.





