गावागावांतील पाण्याचा हिशेब आता डिजिटल नोंदीत
‘जल सातबारा’ उपक्रमातून पाणीसाठ्याची माहिती संकलित होणार

अमरावती /25 ऑक्टोबर – जिल्ह्यात पावसाची कमतरता आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने ‘जल सातबारा’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून गावातील विहिरी, बोअरवेल, तलाव, बंधारे आणि हातपंप यांची माहिती संकलित केली जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठा, प्रत्यक्ष वापर, पाण्याची गरज आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या शक्यता यांचा आढावा घेतला जाईल. त्याआधारे प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करून वर्षभरासाठी पाणी वापराचे नियोजन करता येणार आहे.
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आधीच ओळखून त्यावर उपाययोजना करण्यासाठीही या उपक्रमाची मदत होणार आहे. या उपक्रमांतर्गत गावातील प्रमुख जलस्रोतांची संख्या आणि त्यांची सद्यस्थिती नोंदवली जाईल. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर भूजलपातळीत होणारे बदलही तपासले जातील. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी किती पाणी लागते, पावसाचे पाणी किती साठवले जाते आणि उपलब्ध जलस्रोतांचा किती वापर होतो, याची माहिती जमा केली जाईल. त्यामुळे गावात एकूण किती पाणी उपलब्ध आहे आणि वर्षभरात किती पाणी लागण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेणे शक्य होईल. पाणीसाठ्याचे मूल्यांकन तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती तपासली जाईल. दुसर्या टप्प्यात पावसाळा संपल्यानंतर तलाव, बंधारे आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याचे प्रमाण नोंदवले जाईल. तिसर्या टप्प्यात फेब्रुवारी ते मार्चदरम्यान शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाईल. त्यातून उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि इतर गरजांचे नियोजन करता येईल. प्रत्येक गावाची पाण्याशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने प्रशासनाला पाणीटंचाईची शक्यता असलेली गावे ओळखता येतील.





