लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

छातीत संसर्ग झाल्याची तक्रार

नवी दिल्ली/16 ऑक्टोबर :  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (वय 98) यांना छातीत संसर्ग झाल्याने शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
अडवाणीयांना सायंकाळी 7:30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृद्धापकाळातील आजारांमुळे मे महिन्यात याच रुग्णालयात अडवाणी यांना दाखल करण्यात आले होते. बरे वाटू लागल्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच 7 ऑक्टोबर रोजी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांनी अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले होते. पंतप्रधान मोदी 7 ऑक्टोबर 2001 रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग 25 वर्ष ते सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहत आले आहेत. अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेकी, अनेक दशके सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय जीवनात योगदान देऊन त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. भारताची प्रगती साधण्यात आणि देशाला बळकट करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
2024 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून लालकृष्ण अडवाणी हे राजकारणापासून अलिप्त आहेत. 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी अडवाणी यांनी मोलाचे योगदान दिले होते.
भाजपाच्या यशामध्ये लालकृष्ण अडवाणींचा मोलाचा वाटा राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पाहिले जाते. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक ते देशाचे उपपंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मच पाकिस्ताजनच्या कराचीमध्ये 8 नोव्हें बर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद अडवाणी होते. अडवाणींचे प्राथमिक शिक्षण कराचीतील एका हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस कराचीतील एका हायस्कूसलमध्ये शिक्षक म्हेणून काम केले. त्यानंतर 1947 साली देशाची फाळणी झाली आणि त्यावेळी अडवाणी कुटुंबीय पाकिस्तान सोडून दिल्लीत आले.दिल्लीत आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून आपल्या पुढील कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे ते संघाचे प्रचारक झाले. राष्ट्रीय स्वायंसेवक संघाचे काम करत असतानाच 1957 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यात मदत करू लागले. 1958 ते 1963 या दरम्यान त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिवपद भूषवले. 1960 मध्ये त्यांनी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही पदभार सांभाळला. त्यानंतर 1967 मध्ये त्यांनी पूर्णवेळ राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.

Back to top button