ज्ञानेश कुमार राजीनामा द्या; इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा

राहुल, प्रियांका गांधीसह अनेक खासदार ताब्यात: दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा

आकाशवाणी भवन परिसरातून हटवल्याने संतप्त

नवी दिल्ली/6 ऑक्टोबर  : निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि मतदार याद्यांमधील कथित ’वोट चोरी’च्या विरोधात विरोधी पक्षांच्या ’इंडिया’ आघाडीने दिल्लीत काढलेल्या मोर्चादरम्यान वातावरण चांगलेच तापले. संसद भवनापासून सुरू झालेल्या या निदर्शनांनंतर दिल्लीपोलिसांनी कारवाई करत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतले. आकाशवाणी भवनाच्या आवारात धरणे आंदोलनासाठी बसलेल्या या नेत्यांना पोलिसांनी अखेर तेथून ताब्यात घेऊन दूर नेले.

मंगळवारी (6 ऑक्टोबर) विरोधी पक्षांच्या 300 हून अधिक खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे (निर्वाचन सदन) मोर्चा काढला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला मध्येच रोखले. त्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोग कार्यालयाजवळ असलेल्या आकाशवाणी भवन परिसरातच रस्त्यावर आणि झाडांखाली धरणे आंदोलनाला बसले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही देशातील कोट्यवधी जनतेच्या मतांच्या हक्कासाठी लढा देत आहोत. आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून प्रश्न विचारायचे आहेत, पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत आणि धमकावत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. आपण शांततापूर्णमार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांकडून लोकशाहीचा गळा आवळला जात असल्याचेही ते म्हणाले. आकाशवाणी भवन परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने पोलिसांनी अखेर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना बसमध्ये बसवून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र बाचाबाची आणि मोठी धावपळ उडाली. या घटनेनंतर दिल्लीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

गांधी भावंडांचा गनिमी कावा
मंगळवारी (6 ऑक्टोबर) दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे आज दिल्लीतील संसद परिसराला आणि आकाशवाणी परिसराला छावणीचे स्वरूप आले.पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अन्य खासदारांना ताब्यात घेतले. मात्र, यावेळी गांधी भावंडांनी गनिमी कावा करत आकाशवाणी भवनाचा मार्ग वापरत मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आकाशवाणी भवनात अडवण्यात आले.

Back to top button