कोरोनापेक्षा राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे

उत्सवांवरील खर्च टाळा

मंत्री बावनकुळेंचे कार्यकर्त्यांसह नागरिकांना आवाहन

नागपूर/5 ऑक्टोबर  : राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून कोरोना महामारीपेक्षाही हे संकट मोठे आहे. पुढील आठ महिने पाणी, चारा आणि शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे व नागरिकांनीदेखील उत्सवांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपची सोमवारची प्रस्तावित पाच हजार कार्यकर्त्यांची रॅलीही रद्द करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हारतुरे स्वीकारू नयेत, वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत. अनेक भागांत पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतकरी व शेतमजूर अडचणीत आहेत. त्यामुळे हार, फुले, बुके, बँड यावर खर्च करण्याऐवजी तो पैसा गरजुंच्या मदतीसाठी वापरावा. दुष्काळी कामांसाठीप्रत्येकाने योगदान देण्याची भूमिका घ्यावी. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणुकीच्या काळात पक्षातील कोणत्याही नेत्याकडून चुकीचा फोन किंवा संदेश जाऊन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यात यावी. मंत्र्यांनी काही दिवस मुंबईला जाणे टाळावे आणि मतदारसंघातील समस्या व निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले. विदर्भाचा कार्यकर्ता म्हणून आपण स्वतः निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेवणार असून दररोज किती मतदारांची नोंदणी केली, याची माहिती एसएमएसद्वारे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांना उमेदवारी न मिळाल्याने काहीशी निराशा झाली असली तरी ते पक्षाचे नेते आहेत. पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर सर्वांनी एकत्रित काम करणे अपेक्षित आहे. आपण स्वतः सोले यांच्याशी चर्चा करून निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर निर्णय घेतले आहेत. तरीही काही आंदोलन सुरू असून काँग्रेसकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न राजकारणासाठी वापरू नये, असे ते म्हणाले.

Back to top button