महापालिकेतील 57 अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या

आयुक्त मंगेश गोंदावले यांचे आदेश

अमरावती /2ऑक्टोबर- महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या 57 अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश अखेर जारी केले आहेत. यापूर्वी बदलीचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न करणार्‍या 4 अधिकारी कर्मचार्‍यांचाही यात समावेश आहे. संबंधितांनी 2 ऑक्टोबरपर्यंत नव्या जबाबदार्‍या स्वीकाराव्यात, अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.(महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा निर्णय आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी घेतला. गेल्या काही महिन्यांपूर्वी 4 अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अखेर प्रशासनाने त्यांच्यावरही कारवाई करत बदल्या निश्चित केल्या. बदली झालेल्यांमध्ये लेखा विभागातील अधिकारी प्रवीण इंगोले यांची बडनेरा झोनमध्ये बदली करण्यात आली आहे. विद्युत विभागातील आकाश तीर्थकर यांनाही बडनेरा झोनमध्ये पाठविण्यात आले आहे. पशुशल्य विभागातील गुणसागर गवई यांची झोन क्रमांक 3 मधील दस्तूरनगर येथे बदली करण्यात आली. तर झोन क्रमांक 2 मधील स्वप्नील रामसे यांची झोन क्रमांक 4 बडनेरा येथे बदली झाली आहे. महापालिकेतील कामकाज अधिक सुरळीत व्हावे आणि एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत राहणार्‍या कर्मचार्‍यांची फेररचना व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे पालन करून सर्व संबंधितांनी नव्या ठिकाणी तातडीने जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button