पदासाठी नव्हे, जनसेवेसाठी प्रशासनात या

यूपीएससी शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली/1सप्टेंबर : प्रशासकीय सेवेत येणार्‍या युवकांची निवड केवळ त्यांच्या ज्ञानाच्या आधारे न करता, त्यामागील जनसेवेची प्रेरणाही तपासली पाहिजे. तसेच युवकांनी पदासाठी नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रशासनात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. 1 ऑक्टोाबर) केले. ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘नागरिक प्रथम’ ही प्रशासनाची मूलभूत तत्त्वे असावीत, असे स्पष्ट करत त्यांनी यूपीएससीच्या भरती प्रक्रियेत बदलत्या काळानुसार सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. येथील भारत मंडपम येथे यूपीएससी शताब्दी समारंभात ते बोलत होते.
नवी दिल्लीतील यूपीएससीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी हा केवळ एका संस्थेच्या शताब्दीचा सोहळा नसून दरवर्षी या परीक्षेकडे आशेने पाहणार्‍या लाखो युवकांच्या आकांक्षांचा आणि देशातील नागरिकांच्या संस्थेवरील विश्वासाचा उत्सव असल्याचे सांगितले. भारताला 2047पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने पुढील 25 वर्षे निर्णायक ठरणार असल्याचे सांगत मोदी यांनी भविष्यातील प्रशासनासमोरील आव्हानांचा वेध घेतला. ‘नागरिक देवो भव’ हा प्रशासनाचा मूलमंत्र असावा आणि नागरिकसेवा सर्वोच्च मानली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
21व्या शतकातील प्रशासन जनहितैषी, सक्रिय आणि सुशासनावर आधारित असावे. नागरिकांच्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्यावर उपाय करण्याऐवजी त्यांचा आधीच अंदाज घेऊन उपाययोजना करणार्‍या अधिकार्‍यांची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
परीक्षा चक्र कमी करण्यासाठी सूचना- दीर्घकाळ चालणार्‍या परीक्षा प्रक्रियेमुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबांवर कोचिंग शुल्क, निवास आणि प्रवासाचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे परीक्षा चक्र कमी करण्यासाठी सुधारणा करण्याची सूचना त्यांनी केली. परीक्षा प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करणे हा समान संधीशी संबंधित मुद्दाही असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button