विदर्भाच्या राजाला ढोल -ताशांच्या गजरात निरोप
न्यू आजाद गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात महाआारतीने शोभायात्रेस प्रारंभ

विविध ढोल-ताशे पथक व वारकरी दिंडीने वेधले लक्ष
मोसीकॉल मीलच्या परिसरात महाआरतीने विसर्जन
शोभायात्रेत जिल्ह्यातील हजारो भाविकांचा सहभाग
प्रमुख मार्गावर आकर्षक रांगोळ्याची सजावट
राजकमल चौकात महाआरतीत मान्यवरांसह हजारो भाविकांची उपस्थिती
अमरावती /1 ऑक्टोबर- स्थानिक खापर्डे बगीचा परिसरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापित 21 फूट उंच ‘विदर्भाचा राजा’ची शाही विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी 4 वाजता महाआरती करून अत्यंत भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. यावेळी मंडळाचे प्रमुख नगरसेवक दिनेश बुब, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, दैनिक अमरावती मंडल व दैनिक आपली मातृभूमीचे संपादक तथा नगरसेवक आणि गणेशोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलू शेखावत यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत महापूजा करण्यात आली. त्यानंतर सजवलेल्या आकर्षक रथावर बाप्पाची भव्य मूर्ती विराजमान करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. बाप्पाचा रथ मार्गस्थ होताच ढोल-ताशांचा गजर, झांजांचा खणखणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
मिरवणुकीत विविध ढोल-ताशा आणि झांज पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक वादनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. तरुणाई ढोलाच्या तालावर तल्लीन होऊन थिरकताना दिसत होती, तर वारकरी दिंडीतील टाळ-मृदुंगाच्या गजराने वातावरणात वेगळाच भक्तिभाव निर्माण केला. मिरवणुकीचा मार्ग इर्विन चौक, मालवीय चौक आणि जयस्तंभ चौक असा पुढे सरकत राहिला. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक व मनमोहक रांगोळ्या काढल्या होत्या. केळीचे खांब आणि रंगीबेरंगी तोरणे बांधून शहराला उत्सवाचे रूप दिले होते. रस्त्यावरून बाप्पाची स्वारी पुढे जात असताना दुतर्फा उभे असलेले हजारो भाविक, महिला व बालगोपाळ हात जोडून दर्शन घेत होते आणि रथावर फुलांची उधळण करत होते. या मिरवणुकीत अमरावतीची कुलदैवत अंबादेवी, एकवीरा देवी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सजीव देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रात्री 8 वाजता मिरवणूक मुख्य राजकमल चौकात पोहोचली. तिथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीला मंडळाचे अध्यक्ष दिनेश बुब, खा. बळवंत वानखडे, माजी खा. अनंत गुढे, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, मनपा महापौर श्रीचंद तेजवानी, सोहळ्याचे अध्यक्ष तथा अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, मनपा स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे, मनपा सभागृह नेते चेतन गावंडे, काँग्रेस नेते बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेता विलास इंगोले, माजी आ. प्रदीप वडनेरे, काँग्रेस नेते सुरेश रतावा, मनपा माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे, उद्योजक चंद्रकांत पोपट, मनपा माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, गणेशभक्त विनोद मोदी, काँग्रेस नेते भैय्या पवार, सक्रिय कार्यकर्ते अमित मोतीवाला, शिवसेना नेते संतोष बद्रे, शिवसेना नेते अजय महल्ले, उद्योजक धनंजय बंड यांच्यासह शहरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकमल चौकात महाआरती सुरू असताना संपूर्ण चौक बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
महाआरती संपन्न झाल्यानंतर ही शाही मिरवणूक श्याम चौक, जयस्तंभ चौक, वसंत चौक, दीपक चौक, हॉटेल आदर्श चौक, जुना कॉटन मार्केट व चौधरी चौक मार्गे पुढे रवाना झाली. रात्री उशिरा मिरवणूक मोसीकॉल मील परिसरात पोहोचली. तेथे उभारण्यात आलेल्या विसर्जन स्थळावरील विशाल विहिरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत 21 फूट उंच बाप्पाचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. भाविकांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. मिरवणुकीच्या मार्गावर शहर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
अमरावतीत न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या 21 फूट उंच ‘विदर्भाचा राजा’ची भव्य विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशांच्या दणक्यात आणि वारकरी दिंडीच्या जल्लोषात गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली. दुपारच्या पूजेनंतर निघालेली ही शाही मिरवणूक मुख्य मार्गांवरून फिरत राजकमल चौकात पोहोचली, जिथे सर्वपक्षीय नेते व हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. त्यानंतर मध्यरात्री मोसीकॉल परिसरातील विहिरीत गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
लाखो भाविकांनी घेतला ‘मंडल न्यूज’च्या थेट प्रक्षेपणाचा लाभ
दैनिक अमरावती मंडळाच्या ‘मंडळ न्यूज’ या यूट्यूब वाहिनीवरून दुपारी 2 वाजल्यापासूनच विसर्जन सोहळ्याचे सलग थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. विसर्जन विधी पूर्ण होईपर्यंत हे थेट प्रक्षेपण अविरतपणे सुरू होते. घरामध्ये असणार्या ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी आणि शहराबाहेर असलेल्या भाविकांनी घरबसल्या आपल्या भ्रमणध्वनीवर बाप्पाच्या शाही मिरवणुकीचा आनंद घेतला. वेळ जशी पुढे सरकत गेली, तसतशी या वाहिनीवर ऑनलाईन दर्शकांची गर्दी वाढत गेली. हजारो अमरावतीकरांनी या थेट प्रसारणाचा लाभ घेऊन लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.
स्वच्छतेचा अनोखा आदर्श मंडळाने दिला
न्यू आझाद मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छतेचा वस्तुपाठ घालून दिला. मिरवणूक पुढे सरकत असतानाच रस्त्यावर भाविकांनी टाकलेले रिकामे चहाचे कप, प्लेट्स आणि निर्माल्याचा कचरा उचलण्यासाठी मंडळाने मिरवणुकीच्या मागे खास कचरा गोळा करणारी गाडी आणि सफाई कामगारांची स्वतंत्र तुकडी सज्ज ठेवली होती. क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण रस्ता लगेच झाडून लख्ख करण्यात येत होता. त्यामुळे विसर्जनाचा मार्ग अत्यंत स्वच्छ राहिला. मंडळाच्या या पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध उपक्रमाचे अमरावती शहरात सर्वत्र कौतुक करण्यात आले.
सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी अन्नदान
शहराच्या विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, व्यापारी मंडळे आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन अखंड सेवेचा आदर्श निर्माण केला. खापर्डे बगीचा ते मोसीकॉल मीलपर्यंतच्या मुख्य चौकांमध्ये भाविकांसाठी मोफत थंडगार पिण्याचे पाणी, सरबत, ताक आणि अल्पोपाहाराची चोख व्यवस्था उभारण्यात आली होती. दुपारच्या उन्हात आणि संध्याकाळच्या गर्दीत पायी चालणार्या हजारो नागरिकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला. अमरावतीच्या दानशूर नागरिकांनी दाखवलेल्या या सामाजिक सलोख्यामुळे आणि सेवाभावामुळे विसर्जन सोहळ्यातील उत्साहाला एक आगळेवेगळे कौटुंबिक रूप प्राप्त झाले होते.





