आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

दिवेआगर येथील समुद्रकिनारी मोठी दुर्घटना

व्हिनस अकॅडमीचे 42 विद्यार्थी गेले होते शैक्षणिक सहलीला

पुणे /1 सप्टेंबर : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनार्‍यावर आज एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही सर्व मुले पुण्याच्या आळंदी येथील ’व्हिनस अकॅडमी’ या खासगी क्लासेसची विद्यार्थी होती. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण दिवेआगर आणि आळंदी परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. याच पार्श्वभूमीवर आळंदी येथील व्हिनस अकॅडमीच्या इयत्ता 11 वी आणि 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीमध्ये एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यामध्ये 17 मुली आणि 25 मुलांचा समावेश होता. दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी पर्यटनाचा आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होते. त्यावेळी काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे आठ विद्यार्थी पाण्याच्या जोरदार लाटांमध्ये ओढले गेले आणि खोल पाण्यात बुडाले.
विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनार्‍यावर एकच आरडाओरड झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि ’महाकाली वॉटर स्पोर्ट्स’च्या कर्मचार्‍यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी समुद्रात धाव घेऊन अथक प्रयत्नांनंतर सर्व आठही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तरुण विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button