अमरावतीच्या शीतपेय निर्मिती उद्योगास भेट

समाज कल्याण अधिकार्‍यांकडून आढावा

अमरावती /30 सप्टेंबर : सेवा संकल्प अभियानांतर्गत समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत नांदगाव पेठ येथील नवीन एमआयडीसी परिसरातील ‘संबोधी ग्रो फूड अँड ब्रेव्हरीज’ या उद्योगाला समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर आणि इतर अधिकार्‍यांनी भेट देऊन उद्योगाच्या प्रगतीची माहिती घेतली.
समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थ्याच्या 25 टक्के स्वहिस्स्यापैकी जास्तीत जास्त 15 टक्के रक्कम शासनाकडून मार्जिन मनी म्हणून अनुदानात्मक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ घेत उद्योजक नीतू पंकज भालचक्र यांनी नांदगाव पेठ, नवीन एमआयडीसी, अमरावती येथे ‘संबोधी ग्रो फूड अँड ब्रेव्हरीज’ हा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगात जीरा सोडा, ऑरेंज सोडा, जलजीरा सोडा आणि पुदिना फ्लेवर्ड शीतपेयांचे उत्पादन केले जाते. स्थानिक पातळीवर उत्पादन करून त्याची बाजारपेठेत विक्री करण्याच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योग उभारणीसाठी स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत 78 लाख रुपयांच्या कर्जावर समाज कल्याण विभागाकडून 11 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. या आर्थिक सहाय्यामुळे उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री, उत्पादन व्यवस्था तसेच व्यवसायाच्या विस्ताराला मदत झाल्याचे लाभार्थी नीतू भालचक्र यांनी सांगितले. याबाबत बोलताना नीतू भालचक्र म्हणाल्या, योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे स्वतःचा उद्योग उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले. व्यवसायामुळे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, उद्योगाच्या माध्यमातून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येत आहेत. समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी उद्योगाला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया व उद्योगाच्या प्रगतीची माहिती घेतली. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देत आर्थिक स्वावलंबनाची दिशा निर्माण करणारे असे उद्योग इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतात. स्टँड-अप इंडिया योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या संधींचा लाभ घेऊन नवीन उद्योग उभारावेत आणि रोजगारनिर्मितीला हातभार लावावा, असे आवाहन माया केदार यांनी केले.

Back to top button