अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत जोरदार घमासान
भाजपच्या दोन गटांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भेट
अमरावती /30सप्टेंबर – अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. एका बाजूला खा. डॉ. अनिल बोंडे यांचा गट तर दुसर्या बाजूला रविराज देशमुख यांचा गट आमनेसामने उभा ठाकला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची जोरदार चर्चा असतानाच भाजपच्या या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली ताकद दाखवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद थेट मुंबईच्या दरबारात पोहोचल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये नक्की कोणाकडे जाणार यावरून आधीच संभ्रम असताना भाजपच्या स्थानिकनेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपचे खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली एका गटाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यापाठोपाठ लगेचच भाजप नेते रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या गटानेही फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेत निवडणुकीवर आपला दावा ठोकला. दोन्ही गटांच्या या स्वतंत्र आणि वेगळ्या भेटीगाठींमुळे अमरावती भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे राजकारण उघड झाले आहे.
दुसरीकडे ही जागा महायुतीतून शिवसेना शिंदे गटाला सोडली जाण्याची चर्चा जोर धरत आहे. शिंदे गटाकडूनही या जागेवर भक्कम दावा केला जात आहे. मित्रपक्षाला जागा सुटणार अशी शक्यता बळावत असताना भाजपने मात्र उमेदवारीवरून आपापसातच जोरदार संघर्ष सुरू केल्याने महायुतीत प्रचंड गोंधळ उडाला आहे. शिक्षक मतदारांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही नेते शर्थीचे प्रयत्न करत असून या वादावर वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.





