डफरीन अग्निकांडातील सीसीटीव्हीत परिचारिका दिसल्या झोपेत

माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा पत्रकार परिषदेतून भंडाफोड

धोक्याचा अलार्म वाजूनही कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष उघड
सीसीटीव्हीतील घटनेवरून चौकशी अहवालावर संशय
दोषींना पाठीशी घालण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
अग्निशमन यंत्रणेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी

अमरावती /30 सप्टेंबर- जिल्हा स्त्री सामान्य (डफरीन) रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आगीच्या वेळी अतिदक्षता विभागाबाहेर कर्तव्यावर असलेल्या परिचारिका गाढ झोपेत होत्या. धोक्याचा लाल दिवा लागून 3 वेळा अलार्म वाजला, तरीही त्यांना जाग आली नाही. यंत्राचा स्फोट झाल्यावर त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरू झाली. अधिकृत चौकशी अहवाल आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील प्रत्यक्षात दिसणारे दृश्य यात मोठी तफावत असून प्रशासनाने जबाबदार लोकांना वाचवण्यासाठी बनावट अहवाल तयार केल्याचा थेट आरोप माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या संपूर्ण अग्निकांडाची आणि साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराची तांत्रिक चौकशी करून अहवाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.
अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजून 53 मिनिटांनी अचानक आग भडकली. खोलीबाहेर धोक्याचा भोंगा 3 वेळा मोठ्याने वाजला आणि लाल दिवा लागला. मात्र कर्तव्यावर तैनात दोन परिचारिका गाढ झोपेत पडून राहिल्या. आगीच्या ज्वाळा पसरल्यानंतर 2 वाजून 54 मिनिटांनी तीव्र झळ लागल्यावर त्या खडबडून जाग्या झाल्या. शेजारच्या खोलीतून मुख्य परिचारिका धावत बाहेर आली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी आत धाव घेऊन 36 बालकांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत 3 नवजात बालकांचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत झाला होता.
डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील दृश्य दाखवून प्रशासनाचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला. चौकशी अहवालात मुख्य परिचारिका बाळाला दूध पाजत असल्याचे नमूद केले होते, पण कॅमेर्‍यात ती दुसर्‍याच खोलीतून झोपून उठून धावत येताना स्पष्टपणे दिसते. आग रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लागली असताना अग्निशमन दल पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पोहोचले. या 40 मिनिटांच्या अंतराबाबत रुग्णालयाचे दप्तर आणि फोन नोंदी तपासून सखोल शहानिशा होणे गरजेचे आहे. कर्मचार्‍यांकडून बेफिकीरी झाली असली तरी नंतर त्यांनी बालकांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली, त्यामुळे केवळ छोट्या कर्मचार्‍यांना बळीचा बकरा बनवून मूळ सूत्रधारांना वाचवू नये, असे ते म्हणाले. रुग्णालयाच्या इमारतीची मूळ रचना बदलून 3 सभागृहांच्या जागेवर शिशू कक्ष थाटण्यात आला. त्यावेळी सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत. 12 ते 13 लाख रुपयांचे कृत्रिम श्वसन यंत्र तब्बल 22 ते 23 लाख रुपयांना चढ्या दराने विकत घेऊन कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली. आगीच्या वेळी पाण्याचा दाब दिल्यावर नळजोडणी फुटली. वीज आणि आग प्रतिबंधक यंत्रणेची कामे उपकंत्राटदारांना बेकायदेशीरपणे सोपवण्यात आली होती. 2022 आणि 2026 मधील तंत्रज्ञ भरती प्रक्रियेतही गैरव्यवहार झाला आहे. 11 सदस्यीय समितीचा गोपनीय अहवाल तात्काळ लोकांसमोर ठेवून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी.

खरेदी घोटाळा आणि सुरक्षेत मोठी गडबड
रुग्णालयात 12 लाखांचे श्वसन यंत्र 23 लाखांना खरेदी करून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. इमारतीचा मूळ आराखडा बदलून सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले गेले. आगीच्या वेळी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद पडली. केवळ कर्मचार्‍यांवर ठपका न ठेवता साहित्य पुरवठादार, कंत्राटदार आणि अधिकार्‍यांची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून सत्य बाहेर आणावे.

Back to top button