बुद्धिबळातून संयम विचारांची ताकद अधिक वाढते
संपादक अनिल अग्रवाल यांचे प्रतिपादन

* आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
175 खेळाडूंचा सहभाग निवड चाचण्यांकडे लक्ष
अमरावती /22 सप्टेंबर – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2026-27 अंतर्गत श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेतील अ विभागाच्या सामन्यांना सुरुवात झाली. 20 ते 26 सप्टेंबरदरम्यान होणार्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील 175 खेळाडू सहभागी झाले आहेत. मुलांचे 18 तर मुलींचे 14 संघ स्पर्धेत उतरले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन दैनिक मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे अध्यक्ष वसंतकुमार मालपाणी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी महाविद्यालय गेल्या दोन दशकांपासून विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनात सातत्याने योगदान देत असल्याचे सांगितले. मध्य भारतातील पहिले ग्रँडमास्टर स्वप्नील धोपाडे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी नमूद केले. अनिल अग्रवाल यांनी बुद्धिबळ हा संयम, विचारशक्ती आणि योग्य निर्णय घेण्याची सवय लावणारा खेळ असल्याचे सांगितले. महाविद्यालयाची प्रगती पाहून त्यांनी वसंतकुमार मालपाणी आणि प्राचार्य डॉ. भांगडिया यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतकुमार मालपाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद देशमुख आणि प्रा. सुयोग तायडे उपस्थित होते. स्पर्धेत 18 मार्गदर्शक आणि 18 व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. उपांत्य फेरी 25 सप्टेंबरला तर अंतिम सामना 26 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी मुला-मुलींच्या संघांची निवड करण्यासाठी 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान याच महाविद्यालयात निवड चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या आयोजनासाठी वसंतकुमार मालपाणी, जुगलकिशोर गट्टाणी, डॉ. गोविंद लाहोटी, मोहन कलंत्री यांच्यासह डॉ. गजेंद्र रघुवंशी, डॉ. संजय गजभिये, डॉ. सतीश मोदाणी, सौ. सोनाली चौधरी, डॉ. तीर्थराज राय आणि डॉ. अनिलकुमार प्रसाद मेहनत घेत आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिलकुमार प्रसाद यांनी केले.





