कारची अॅक्टिवाला धडक, दोघांचा मृत्यू
भातकुली ते पांढरी मार्गावर भीषण अपघात

कारचालक गंभीर, मृतक आनंदनगर येथील रहीवासी
अमरावती/22 सप्टेंबर– महाजनपुरा भागातील आनंदनगर परिसरात राहणारे दोन व्यक्ती दुचाकीने भातकुलीच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान भातकुलीकडून अमरावतीच्या दिशेने येणार्या कारसोबत त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झाला.
अशोक चंपतराव राऊत (60) आणि अभिजीत उर्फ गोलू अरुण पार्डीकर (35), दोघेही रा. आनंदनगर, अमरावती, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अशोक राऊत आणि अभिजीत पार्डीकर हे दोघे आनंदनगर येथून दुचाकीने भातकुलीच्या दिशेने जात होते. दरम्यान, मार्गातील पांढरी गावापासून काही अंतरावर विरुद्ध दिशेने येणार्या एका भरधाव कारसोबत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच निपचित पडले. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच भातकुलीचे ठाणेदार प्रफुल्लगीते पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पूर्वी नागरिकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, सदर अपघाताचे घटनास्थळ हे बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे पुढील प्रक्रिया बडनेरा पोलिस करीत आहेत.





