स्क्रॅप ऑटोवर दंडात्मक धडक कारवाई

अमरावती/20 सप्टेंबर– मुदत संपलेले व स्क्रॅप घोषित केलेले ऑटो रिक्षा बेकायदेशीरपणे रस्त्यावर धावणे तसेच खासगी वापरासाठी नोंदणीकृत असलेल्या नॉन-ट्रांसपोर्ट ऑटोमधून प्रवाशांची वाहतूक करणे, याविरोधात आता परिवहन विभागाने कडक पाऊल उचलले आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या वाहनांविरोधात अमरावती जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून आरटीओची पथके 5 ऑक्टोबरपर्यंत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करतील.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी वापराची नोंदणी असलेल्या ऑटोमधून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. ग्रामीण भागासह अमरावती जिल्हा मुख्यालायातूनही असे ऑटो प्रवाशांना भरून धावताना दिसतात. सुरक्षेचे मानदंड न पाळणारी ही जुनी वाहने अपघातांना आमंत्रण देत असून इतर वाहनचालक व पादचार्‍यांसाठीही धोकादायक ठरत आहेत. आरटीओनुसार अमरावती जिल्ह्यात 15,027 ऑटो नोंदणीकृत असून त्यापैकी केवळ 4,500 ऑटोमध्येच मीटर आहेत. मोठ्या संख्येने ऑटोधारकांकडे व्यावसायिक परवाना नाही. अशा वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर आढळल्यास वाहन मालक व चालकावर हजारो रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांनी स्पष्ट केले की, वयोमर्यादा संपलेल्या आणि नियमबाह्य वाहनांना रस्त्यावर चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही. वाहन स्क्रॅप करण्यासाठी आधी आरटीओची थकबाकी भरून ’एनओसी’ घ्यावी लागते. त्यानंतर शासनमान्य स्क्रॅपिंग केंद्रात इंजिन व चॅसीस क्रमांक नष्ट केले जातात.

Back to top button