अमरावतीत भरधाव कारमधून तलवारींचा थरार
चित्रफीत पसरवणार्या चार टवाळखोरांना अटक रात्रीच्या अंधारात शहरात सुरू होती गुंडगिरी

अमरावती /14 सप्टेंबर– मध्यरात्रीच्या शांततेत अमरावतीच्या रस्त्यांवर भरधाव मोटारीतून धारदार तलवारी आणि सुर्या नाचवत लोकांमध्ये दहशत पसरवणार्या चार माथेफिरू तरुणांच्या राजापेठ पोलिसांनी सोमवारी जोरदार मुसक्या आवळल्या. काकाच्या नकळत घराबाहेर काढलेली चारचाकी रस्त्यावर सुसाट पळवत समाजमाध्यमांवर शेखी मिरवण्यासाठी चालवलेला हा जीवघेणा थरार एका धाडसी महिलेच्या नजरेत भरला आणि तिने बनवलेली चलचित्राची चकती थेट पोलिसांपर्यंत पोहोचली. या आधारे खाकीने अवघ्या काही तासांत शोधमोहीम राबवून या उनाड टोळक्याला जेरबंद केले असून त्यांच्याकडून पाच तीक्ष्ण हत्यारांसह दहा लाखांचे वाहन जप्त केले आहे.
शहरातील राजापेठ हद्दीत सोमवारी भल्या पहाटे दोन ते तीन वाजताच्या सुमारास हा संतापजनक प्रकार समोर आला. आदित्य संतोष लळे, आदित्य पुरुषोत्तम कडू, सम्मक सुरेश ढोके आणि भावेश किशोर गोंडाने (सर्व रा. अमरावती) अशी कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यातील एकाच्या घरी पाहुणे म्हणून आलेले त्याचे काका रात्री गाढ झोपेत असताना तरुणांनी कोणालाही थांगपत्ता लागू न देता त्यांची चारचाकी घराबाहेर काढली. भररस्त्यात वाहनाच्या खिडक्यांमधून उघडी हत्यारे हवेत फिरवत दहशत माजवण्याचा आणि त्याची चित्रफीत बनवण्याचा हा प्रकार सुरू होता.
पाहुण्यांचे वाहन चोरून नेत चालत्या वाहनातून सुर्यांचा खेळ मांडणार्या या टोळक्यावर रस्त्याने जाणार्या एका सजग भगिनीची नजर पडली. तिने प्रसंगावधान राखत आपल्या वाहनातून या प्रकाराची चित्रफीत तयार केलीआणि तरुणांना खडसावण्याचा प्रयत्नही केला. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर वार्यासारखी पसरताच राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचली. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे फर्मान सोडले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या चारही टवाळखोरांना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक उमेश मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्यासह अंमलदार मनीष करपे, रवी लिखितकर, अमोल खंडेझोड यांनी ही चोख कामगिरी बजावली. तरुणांच्या ताब्यातून 3,900 रुपये किमतीचे 5 तीक्ष्ण सुरे आणि 10 लाख रुपयांची चारचाकी जप्त केली. आभासी दुनियेत दादागिरी मिरवणार्यांवर पोलीस खात्याची बारीक नजर असून समाजविघातक चाळे खपवून घेणार नाही असा सक्त इशारा या कारवाईने दिला आहे.





