श्रीक्षेत्र वायगाव येथे 14 ते 26 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवाचा जागर

सिद्धिविनायक गणपती संस्थानचा वार्षिक उत्सव

हरिकिर्तन, भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन

टाकरखेडा शंभू/13 सप्टेंबर : भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव येथील प्राचीन व प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती संस्थानचा वार्षिक गणेशोत्सव यंदा 14 ते 26 सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. गणेश चतुर्थीपासून पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या या उत्सवात भाविकांना श्रींचे दर्शन, भजन, प्रवचन, हरिकिर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त श्रींचा महाअभिषेक, कलश स्थापना आणि पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना सकाळी 11 वाजता विश्वेश्वरराव जगन्नाथराव इंगोले व सौ. संध्याताई इंगोले यांच्या हस्ते होणार आहे. उत्सवादरम्यान दररोज पहाटे 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 10 महाअभिषेक, सकाळी 10 ते 12 भजन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन-प्रवचन, हरिपाठ आणि रात्री हरिकिर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.मंगळवार 22 सप्टेंबरपासून सप्ताहारंभ होणार असून, 22 सप्टेंबर रोजी विलासराव महाराज वानखडे यांचे प्रवचन आणि भानुदास महाराज शेळके यांचे कीर्तन होईल. 23 सप्टेंबरला माधव महाराज ठाकरे, 24 सप्टेंबरला नारायण महाराज कुटे, तर 25 सप्टेंबरला हरिदास महाराज पिंपरे यांचे कीर्तन होणार आहे.
शनिवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 11 गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज बोबडे यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर श्रींची विसर्जन मिरवणूक व महाप्रसाद होणार आहे.उत्सवात भानुदास महाराज शेळके, अविनाश महाराज शेळके, विक्की महाराज शिंदे, स्नेहल महाराज शेळके, वैभव महाराज इंगोले, राजेश महाराज इंगोले, गौरव महाराज देशमुख, अमोल महाराज निंभोरकर यांच्यासह अनेक भजनी मंडळी सहभागी होणार आहेत. सिद्धिविनायक वारकरी हरिपाठ मंडळ वायगाव, वीर हनुमान वारकरी हरिपाठ मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button