चांदूरबाजारमध्ये डीजेवर बंदी, गणेशोत्सवात शांततेला प्राधान्य
मंडळांना पोलीस कर्मचार्यांचे ‘दत्तक’ संरक्षण

शांतता समितीच्या बैठकीत मान्यवरांनी मंडळांना केल्या महत्वाच्या सूचना
चांदूरबाजार/13 सप्टेंबर : पोलीस स्टेशन अंतर्गत आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी चांदूरबाजार पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार, दि. 12 सप्टेंबर शनिवार रोजी रघुवंशी मंगल कार्यालय येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस प्रशासनासह महसूल विभाग, महावितरण, नगरपरिषद, पत्रकार, पोलीस पाटील तसेच विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात डीजेवर बंदी असून ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची निर्धारित मर्यादा काटेकोरपणे पाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाला एक पोलीस कर्मचारी ‘दत्तक’ देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचारी आपल्या मंडळाच्या संपर्कात राहून मंडळाच्या उपक्रमांची व आवश्यक माहितीची माहिती पोलीस प्रशासनाला देणार आहे. तसेच चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही विविध मंडळांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, चांदूरबाजार महावितरणचे शाखा अभियंता गजेंद्र कुल्लेवार यांनी गणेश मंडळांनी वीज वापरासाठी अधिकृत वीज जोडणीच घ्यावी, असे आवाहन केले. अनधिकृत वीज जोडणीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचेही सांगण्यात आले.महसूल विभागाच्या वतीने गणेशोत्सवातील उत्कृष्ट आयोजन, सामाजिक उपक्रम, स्वच्छता, शिस्त आणि शांतता यासाठी तालुकास्तरावर तीन बक्षिसे ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मंडळांनी केवळ देखावे आणि ध्वनिप्रदूषणावर भर न देता सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.





