पंजाबी गायकाच्या घरावर बेछूट गोळीबार

गोळ्यांच्या 8 फैरी झाडून हल्लेखोर पसार

चंदिगड/13 सप्टेंबर -दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाचा मित्र आणि पंजाबी गायक गुलाब सिद्धू याच्या घरावर हल्लेखोरांनी काल रात्री बेछूट गोळीबार केला. रात्री सुमारे 1 ते 2 च्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी घराच्या मुख्य गेटवर बेछूट गोळीबार केला. यादरम्यान गोळ्यांच्या सुमारे सात ते आठ फैरी झाडल्याचे निदर्शनास आले आहे. सुदैवाने या गोळीबारात घरातील कुठल्याही सदस्याला दुखापत झाली नाही. गोळीबारानंतर तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात तीन युवक दुचाकीवरून येताना दिसत आहेत. तसेच दुचाकी चालवणारा तरुण घटनेचं चित्रिकरण करत होता. आता घराच्या गेटवर गोळ्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा गुलाब सिद्धू हा घरी उपस्थित नव्हता. तो सध्या त्याच्या कार्यक्रमांसाठी पर देशात आहे. मात्र त्याच्या कुटुंबातील सदस्य घरात होते. सुदैवाने त्यांच्यापैकी कुणालाही दुखापत झाली नाही. गुलाब सिद्धू हा दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचा जवळचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला याची 29 मे 2022 रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Back to top button