डफरिन अग्निकांड अहवालावर ठाकूरांचा आक्षेप

दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी

समितीच्या स्वाक्षर्‍या नसलेला कागद केवळ दिखावा

अमरावती /11 सप्टेंबर – जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरिन) नवजात शिशू कक्षात लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या प्रकरणाच्या चौकशी अहवालावरून नवा वाद पेटला आहे. चौकशी समितीचा हा कागद खरा अहवाल नसून केवळ प्रशासकीय पत्रक असल्याचा घणाघात माजी मंत्री तथा माजी आ. ड. यशोमती ठाकूर यांनी केला असून, दोषींवर नुसते निलंबन नको तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.डफरिन रुग्णालयातील विशेष नवजात शिशू कक्षाला 24 ऑगस्ट रोजी भीषण आग लागली होती.
यात तीन बालकांचा जीव गेला. या दुर्दैवी घटनेची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तब्बल 15 दिवसांनंतर चौकशी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालावर चौकशी समितीतील सदस्यांच्या स्वाक्षर्‍याच नसल्याचा दावा आ. ड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या नसलेला हा अहवाल अधिकृत कसा, असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला.या गंभीर प्रकरणाच्या चौकशी समितीत सर्व संबंधित विभाग तसेच तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे होते. तरीसुद्धा दिव्यांगजन विभागाला या चौकशीतून का डावलण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डफरिन रुग्णालयात 2022 मध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर घटना घडली होती.
तरीही जुन्या वादग्रस्त कंपनीला पुन्हा कंत्राट कोणी आणि का दिले, कंपनीचा मागील कारभार तसेच कामाचा दर्जा तपासला गेला होता का, असे अनेक रोखठोक सवाल त्यांनी प्रशासनाला विचारले आहेत.चौकशी दरम्यान रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे तीन-तेरा वाजल्याचे चव्हाट्यावर आले आहे. आग विझवणारे फवारे बंद होते, धोक्याचा इशारा देणारा गजर वाजला नाही, मुख्य पंप खोली पूर्णपणे कुलूपबंद होती. एवढेच नव्हे तर व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीकडे पुरते दुर्लक्ष झाले होते. या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांचे बळी गेले. केवळ थातूरमातूर निलंबन करून अधिकार्‍यांना पाठीशी घालू नका, तर संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपन्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून संपूर्ण अहवाल जाहीर करा, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button