अंगणवाडी कर्मचार्यांचे पोषण आहारावरून लाक्षणिक उपोषण
थकीत मानधनासह पोषण आहाराच्या निकषांवरून तीव्र रोष

अमरावती/11 सप्टेंबर- लहान मुलांच्या पोषण आहारातील निकृष्ट दर्जा बंद करून अंडी केळी द्यावीत, रखडलेले मानधन तत्काळ जमा करावे, लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यावेत आणि ऑनलाइन कामाच्या जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देत दिवसभराचे लाक्षणिक उपोषण पुकारले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
अमरावती विभागातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू) यांच्या वतीने महिला व बाल कल्याण उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. लहान बालकांना सकस आणि ताजा पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली. ग्रामीण आणि शहरात वाटल्या जाणार्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येत असून पुरवठादारांवर कडक कारवाई करण्याऐवजी उलट अंगणवाडी कर्मचार्यांनाच वेठीस धरले जात आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे पॅकेट बंद करून त्याजागी अंडी, केळी किंवा ताजा शिजवलेला आहार देण्यात यावा, ताजी शिदोरी तयार करण्यासाठी दर वाढवून महिन्याला नियमित बिल अदा करावे, तसेच ग्रामीण भागात कच्चा माल देताना प्रति लाभार्थी 3 रुपये दर देण्याची आग्रही मागणी आंदोलकांनीलावून धरली.शासनाने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांचे थकीत पैसे अजूनही दिले नसून ते तातडीने खात्यात जमा करावेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधी लागू करावा. या सर्व सुविधा सुरू होईपर्यंत कर्मचार्यांना किमान 24 हजार रुपये मासिक मानधन द्यावे. कोरोना काळातील जाहीर केलेले प्रत्येकी 24 हजार रुपये त्वरित वितरित करण्यात यावेत. ऑक्टोबर 2024 पासून अडकलेला प्रोत्साहन भत्ता तत्काळ अदा करावा. याशिवाय ऑनलाइन कामासाठी लावलेले 60 गुणांचे जाचक निकष व कुपोषणाच्या आकडेवारीशी प्रोत्साहन भत्ता जोडणारा अन्यायकारक नियम शासनाने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा येत्या काळात राज्यभरात तीव्र लढा उभारण्याचा इशारा शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला.या आंदोलनात सिटूचे जिल्हाध्यक्ष रमेश सोनुले, सुभाष पांडे, जिल्हा सचिव चंदा वानखडे, राज्य उपाध्यक्ष रेखा वानखेडे, राज्य कमिटी सदस्य रेहाना खान यांच्यासह नीलू मेश्राम, संध्या खांडेकर, ललिता वासनिक, मालती मोहोड, मनीषा मोरे, सुनीता भोवते, वृषाली बोंडे, उज्ज्वला लाड, कल्पना रोडगे, स्वाती गाडे, मीना कापसे, रेश्मा नाज, शमा परवीन, शबाना यास्मिन, वहीदा कलाम, लता मावदे, किरण भोगे, बेबी अनासाने, छाया किटुकले, अरुणा मालवीय, सुरेखा बुटले यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





