रहमत नगरात युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

अमरावतीत सलग दुसर्‍या दिवशी थरारक हत्याकांड

कलीम नगर येथील सरकारी हॉस्पिटल जवळील घटना

जिल्हा सामान्य रुप्ग्नालयात नागरिकांची प्रचंड गर्दी

घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात

पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, घुगे, प्रांजली सोनवणे यांची घटनास्थळी भेट

अमरावती /7 सप्टेंबर– गुन्हेगारांनी पोलिसांचा धाक अक्षरशः धुडकावून लावत खोलापुरी गेट हद्दीतील रहमत नगर व हैदरपुरा भागात पुन्हा एकदा रक्ताचा सडा पाडला. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार ते पाच जणांच्या टोळक्याने भररस्त्यात वीस वर्षांच्या तरुणावर चाकूने सपासप दोन वार करून त्याचा निर्घृण काटा काढला. चोवीस तासांत घडलेल्या या दुसर्‍या हत्येमुळे शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून चालू वर्षातील हा 35 वा बळी ठरला आहे. शेख राहील उर्फ गणी शेख फारूक (वयवर्षे – 21, कबीर नगर, रहमत नगर) असे मयत तरुणाचे नाव असून संतापलेल्या जमावाचा उद्रेक होण्याआधीच पोलिसांनी चक्रे फिरवून तासाभरात दोघांच्या मुसक्या आवळल्या.सोमवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ वादाची ठिणगी पडली होती. तो वाद मिटल्याचा आव आणत दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांनी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास रहमत नगर येथील महापालिका दवाखान्याजवळ राहीलला घेरले. काही समजायच्या आत अंगावर धावून जात त्याच्या छातीवर आणि डोक्यावर शस्त्रांनी सपासप वार चढवले. रक्ताच्या थारोळ्यात राहील निपचित पडताच हल्लेखोर पसार झाले. मित्रांनी तातडीने त्याला दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या थरारक हत्येची वार्ता पसरताच जिल्हा सामान्य रुग्णालयात शेकडो नागरिकांची संतप्त गर्दी उसळली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे, ठाणेदार सीमा दाताळकर, गुन्हे शाखेचे अधिकारी अतुल वर, दिनेश दहातोंडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात मोठा बंदोबस्त लावून परिस्थिती हाताळली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. खोलापुरी गेट पोलीस फरार मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत.

एका तासात दोन आरोपींना अटक
हत्येनंतर लगेच नागपुरी गेट तपास पथक आणि गुन्हे शाखा पथक क्रमांक 1 यांनी संयुक्त मोहीम राबवली. रहमत नगर येठेल रहिवासी शेख मौसीन शेख रफीक (38) आणि सय्यद शोएब सय्यद चांद या दोघांना अवघ्या एका तासात बेड्या ठोकल्या. इतर पसार हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना केली आहेत.

चोवीस तासांत दोन तरुणांचे बळी
गाडगे नगर भागातील कपिलवस्तू नगरात 5 सप्टेंबरला एका वीस वर्षांच्या तरुणाची हत्या झाली होती. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच 7 सप्टेंबरला रात्री पुन्हा राहीलचा जीव गेला. लागोपाठ घडलेल्या या दोन हत्यांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

Back to top button