गुंतवणुकीसाठी सक्षम अंतराळ परिसंस्था उभारा
पंतप्रधानांचे आवाहन; जागतिक अंतराळ शक्तीकडे भारताची वाटचाल

नवी दिल्ली /23 ऑगस्ट : भारत अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असून, नव्या जागतिक व्यवस्थेत देशाने अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळविण्यासाठी अधिक वेगाने वाटचाल करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना त्यांनी भारतातील तरुण अभियंते, डिझायनर, कोडर आणि वैज्ञानिक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून अंतराळ क्षेत्राला नवी दिशा देत असल्याचे नमूद केले.
भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील प्रतिभेला आता जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख मिळत आहे. देशातील अंतराळ क्षेत्र हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असून, या क्षेत्रातील क्षमता आणखी वाढविण्याची गरज असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंतराळ क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. अंतराळ तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि खासगी उद्योग यांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीला मोठी चालना मिळू शकते.भारताच्या अंतराळ परिसंस्थेत खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सनी मजबूत परिसंस्था उभारण्याबरोबरच जगभरातील प्रतिभावंतांना भारताकडे आकर्षित करावे. तरुण अभियंते, वैज्ञानिक, कोडर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या पिढीतील उद्योजक अंतराळ क्षेत्रासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या प्रतिभेला योग्य संधी आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिल्यास भारत जागतिक अंतराळ उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र बनू शकतो. खासगी अंतराळ क्षेत्रातील भारतीय प्रतिभा जगभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारताचे अंतराळ क्षेत्र आकर्षणाचे केंद्र बनत असल्याने आगामी काळात या क्षेत्रातील गुंतवणूक आणि नव्या उद्योगांच्या संधी वाढण्याची शक्यता आहे
45 अब्ज डॉलरच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अंतराळ तंत्रज्ञान हे ‘विकसित भारता’च्या उभारणीतील महत्त्वाचे आधारस्तंभ ठरणार असून, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 45 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.




