महिलांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा डाव फसला
अचलपूरच्या अलकरीम कॉलनीतील थरारक घटना

फरार आरोपींचा पोलिसांकडून शोधू सुरू
लग्नपत्रिकेच्या बहाण्याने घरात घुसले होते दरोडेखोर
अचलपूर /14 ऑक्टोबर– लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने घरात शिरून महिलांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणार्या 2 अनोळखी व्यक्तींना शेजार्यांच्या सतर्कतेमुळे पळ काढावा लागला. अचलपूर शहरातील अल करीम कॉलनीत बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अफाक बेग यांच्या घरात ओळखीचे असल्याचे भासवून प्रवेश करणार्या संशयितांनी आधी विश्वास संपादन केला आणि नंतर महिलांना लक्ष्य केले. मात्र, अफाक यांच्या आईने प्रसंगावधान राखून शेजार्यांना सतर्क केले. नागरिक धावून येताच दोघेही पळून गेले. घटनास्थळाची पाहणी करणार्या अचलपूर पोलिसांनी एक चाकू जप्त केला असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 40 आणि 22 वर्षे वयाच्या दोन अनोळखी व्यक्ती अफाक बेग यांच्या घरी आल्या. त्यांनी अफाक यांच्या ओळखीचे असल्याचे सांगत लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याचे भासवले. त्यामुळे घरातील लोकांना सुरुवातीला त्यांच्याबाबत संशय आला नाही. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर पत्रिकेवर नाव लिहिण्यासाठी पेन मागून घरच्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.काही वेळाने अफाक यांच्या आई नमाजपठणासाठी जात असताना दोघांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना एका खोलीत बंद केल्याची माहिती आहे. त्यानंतर चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून घरातील महिलांना घाबरवण्यात आले. अन्य एका महिलेलाही पकडण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरातील महिलांमध्ये भीती पसरली. मात्र, अफाक यांच्या आईने घाबरून न जाता शेजार्यांना मदतीसाठी सतर्क केले.
घरातील हालचालींची चाहूल लागताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बाहेर गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच दोन्ही संशयितांनी तेथून पळ काढला. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अचलपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची आणि परिसराची पाहणी करून एक चाकू जप्त केला.
संशयितांकडे बंदूक होती का, त्यांनी घरात प्रवेश करण्यासाठी लग्नपत्रिकेचाच बहाणा का केला आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे अल करीम कॉलनीतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्या ओळखीची खातरजमा करावी, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.





