चिमुरडीवर अत्याचार करून हत्या
नराधम आरोपीला अटक; 13 दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हा पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
पुणे/19 ऑगस्ट: पुण्याच्या नसरापूर येथील धक्कादायक घटनेतून समाजमन सावरत नाही तोच, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्याला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणीदरम्यान थेट दोषारोपपत्र सादर करून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे.
मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास गावात सामसूम असताना, शेजारी राहणार्या आरोपीने 9 वर्षांच्या बालिकेला फुस लावून निर्मनुष्य उसाच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिला संपवलं. पुरावे नष्ट करण्यासाठी तिला मारहाण करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही त्याने केला. मुलगी घरी न परतल्यानेकुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला आरोपी स्वतः निर्लज्जपणे ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत शोधमोहिमेत सहभागी झाला होता.पोलिसांच्या तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. पोलीस आणि ग्रामस्थ जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासत होते, तेव्हा हा आरोपीदेखील त्यांच्यासोबतच बसलेला होता. फुटेजमध्ये सायकलवरून जाणारी एक व्यक्ती दिसताच ’मीच सायकलवरून चाललोय’ असं आरोपी स्वतःहून बोलून गेला आणि पोलिसांना तपासाचा पहिला महत्त्वाचा क्लू मिळाला.
त्यानंतर दुसर्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीच सायकल डावीकडे वळताना दिसली. आरोपीने मळ्यात गेल्याचा दावा केला होता, परंतु त्या मार्गावरील कॅमेर्यात तो दिसला नाही. पोलिसांचा संशय बळावताच त्याला गाडीत बसवून पोलिसी हिसका दाखवला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तागाच्या शेतीजवळील पाईपच्या खाली चिमुकलीचा मृतदेह लपवल्याचे त्याने पोलिसांना दाखवून दिले.





