सरसंघचालक गजानन महाराजांच्या समाधीस्थळी
झेन-झीसोबत संवादानंतर

बुलढाणा /7 ऑगस्ट : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे ‘झेन -जी ‘चे यशस्वी आंदोलन विविध अर्थाने गाजले. त्याचे पडसाद अजूनही देशभरात उमटत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल गुरुवारी तरुणाई शी अर्थात दोन हजार युवकांशी संवाद साधला. या संवादावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना सरसंघचालक मोहन भागवत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौर्यावर आले आहेत.
ते आजपासून दोन दिवसीय शेगाव आणि खामगाव दौर्यावर आहेत. दौर्याच्या सुरुवातीलाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि चरणी नतमस्तक झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वारकर्यांच्या उपस्थितीत टाळ-मृदुंगाच्या गजरात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहन भागवत यांनी मंदिर प्रशासनाकडून संस्थानच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.




