9 ऑगस्ट रोजी 1 हजार कुत्रे व मांजरांचे मोफत लसीकरण शिबीर
अमरावती रेबीजमुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल

नेताजी क्रीडा मंडळ व सोपारिका फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
पत्रकार परिषदेत दिली आयोजनाची माहिती
अमरावती/5 ऑगस्ट-अमरावती शहर रेबीजमुक्त करण्याच्या उद्देशाने ’नेताजी क्रीडा मंडळ’ आणि ’सोपारिका फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, 9 ऑगस्ट रोजी रुक्मिणी नगर येथील नेताजी क्रीडा मंडळ मैदान (गेटलाईफ हॉस्पिटलजवळ) येथे मोफत अँटी-रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार असून, यामध्ये सुमारे 1,000 पाळीव व भटक्या कुत्र्यांना तसेच मांजरांना मोफत लस दिली जाईल. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, रेबीज हा 100% प्राणघातक आजार आहे, परंतु वेळेवर लसीकरण करून तो पूर्णपणे रोखता येऊ शकतो. त्यामुळे पाळीव व भटक्या प्राण्यांचे नियमित लसीकरण केवळ प्राण्यांच्या कल्याणासाठीच नव्हे, तर मानवी सुरक्षेसाठीही अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
या शिबिरात पाळीव (पेट) आणि रस्त्यावरील (स्ट्रीट) कुत्रे व मांजरांना पूर्णपणे मोफत अँटी-रेबीज व्हॅक्सीन दिली जाईल. आयोजकांनी शहरवासीय, प्राणीप्रेमी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अधिकाधिक संख्येने पाळीव प्राण्यांना शिबिरात आणावे आणि भटक्या प्राण्यांनाही लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यात सहकार्य करावे. आयोजकांच्या मते, ही मोहीम केवळ लसीकरणापुरती मर्यादित नसून अमरावतीला रेबीजमुक्त करण्याचे ध्येय साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या जनहितकारी अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, जेणेकरून कोणताही प्राणी या जीवनरक्षक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन नेताजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन रा. देशमुख, सचिव मंगेश काले तसेच सोपारिका फाउंडेशनचे अध्यक्ष भार्गव सोपान चेडे, उपाध्यक्ष प्रशांत पी. मोतवर आणि सचिव सोपान नामदेवराव चेडे व अनूप खरबडे यांनी केले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी व्यापक तयारी केली जात आहे.




