बंदूक दाखवून जीवाने मारण्याची धमकी

मालमत्ता वादातून वसंत टॉकीजमागे राडा

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती /4 ऑगस्ट – शहरातील वसंत टॉकीजच्या मागे असलेल्या एका मालमत्तेच्या वादातून एका पक्षाने दुसर्‍या पक्षावर पिस्तोल दाखवून जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी बीएनएसच्या कलम 351(2) व 352 अन्वये एनसीआरटी नोंदवून तक्रारदाराला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
तक्रारीनुसार, चिलमछावणी येथील मुस्ताक हुसैन फिदा हुसैन (59) हे 3 ऑगस्ट रोजी दुपारी विजय भुतडा यांच्या निवासस्थानी मालमत्तेच्या व्यवहाराबाबत चर्चेसाठी गेले होते. त्यावेळी रशीद शाह वजीर शाह, मंगेश चंद्रप्रसाद शुक्ला आणि त्यांची पत्नी तेथे आले. व्यवहारा वरून वाद सुरू असताना रशीद शाह यांनी कंबरेचे पिस्तोल काढून मुश्ताक यांच्यावर ताणले आणि व्यवहारात ढवळा ढवळ केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. स्वतःवर अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगत आरोपींनी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या वेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि कोट्यवधींचे पेमेंट व पॉवर ऑफ अटॉर्नीवरून झालेला वाद या बाबी मुस्ताक हुसैन यांनी मांडल्या आहेत. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते असलेल्या मुश्ताक यांनी सुरक्षेची व कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी एनसीआरटी नोंदवून पुढील कारवाई न्यायालयीन निर्देशानुसार होईल असे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button