निमा अमरावतीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. शरद भोयर यांना प्रदान
वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ, निःस्वार्थ सेवेचा सन्मान; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

अमरावती/31 जुलै: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अमरावतीच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ, निःस्वार्थ व समर्पित सेवेसाठी तसेच निमा संघटनेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक आणि रुग्णसेवक डॉ. शरद भोयर यांना प्रतिष्ठेचा ‘निमा जीवनगौरव पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. रविवार, 26 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.निमा अमरावतीने वैद्यकीय व्यवसाय, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक क्षेत्रात निःस्वार्थपणे योगदान देणार्या ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने 2025 पासून ‘निमा जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, यापूर्वी पहिला पुरस्कार विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शरद देशमुख यांना प्रदान करण्यात आला होता. या उपक्रमातून वैद्यकीय सेवेत आयुष्यभर मोलाचे योगदान देणार्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची गौरवास्पद परंपरा निमा अमरावतीने निर्माण केली आहे. या विशेष कार्यक्रमाला निमा अमरावतीचे अध्यक्ष डॉ. प्रविण औगड, निमा सेंट्रल कौन्सिलचे सहसचिव डॉ. विजय अजमिरे, माजी सरचितणीस डॉ. अनिल बाजारे, डॉ. कमल राऊत, डॉ. आशिष येवतीकर आणि आयुर्वेद फोरम अमरावतीचे अध्यक्ष डॉ. उन्मेष डालके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांच्या हस्ते डॉ. भोयर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉ. धीरज इसोकार यांनी डॉ. भोयर यांच्या साधेपणाचे आणि कामातील प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात या लोकधर्मी डॉक्टरला दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




