अमरावती पोलिसांकडून ड्रग्स तस्करला इंदूरमध्ये अटक
आंतरराज्यीय ड्रग्जचा व्यापाराचा भांडाफोड

गुन्हे शाखेची नाट्यमय थरारक कारवाई
अमरावती /29 जुलै: शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झालेल्या एमडी ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावत अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने मध्य प्रदेशातील इंदूर शहरात थेट धडक देत एका आंतरराज्यीय तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 20.5 ग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख 10 हजार रुपयांचे घातक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद रमजान (वय 43, रा. दाऊदीनगर, गल्ली नं. 2, इंदूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी 23 जुलै रोजी पाटीपुरा येथील मो. सईद मो. शरीफ याला अटककेली होती. त्याच्याकडून 214 ग्रॅम एमडीसह तब्बल 51 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्या चौकशीदरम्यान या रॅकेटचे थेट मध्य प्रदेशातील इंदूर कनेक्शन असल्याचे समोर आले. अमरावती पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मोबाइल लोकेशनचा ठाव घेत थेट इंदूर गाठले. तेथील खजराना परिसरातील दाउदीनगर गल्ली क्रमांक 2 मध्ये सापळा रचून पोलिसांनी मोहम्मद युनूस मोहम्मद रमजान या मुख्य तस्कराला शिताफीने ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या घराची झडती घेतली असता, तेथे 20.5 ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ हाती लागला. आरोपीने हा माल विक्रीसाठी बाळगल्याची कबुली दिली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला अमरावती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई-पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्तद्वय यशवंत सोळंके व प्रांजली सोनावणे, एसीपीद्वय कैलास पुंडकर व नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे व अतुल वर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकासह सायबर सेलच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे अमरावती-इंदूर ड्रग्स सिंडिकेटचे धागेदोरे उघड झाले असून, पोलिस आता या तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक कसून चौकशी करत आहेत.




