चांदूर रेल्वेच्या जंगलात 2 बिबट्यांची शॉक देऊन हत्या; दोन शिकारींना अटक
वाइल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोच्या चमूची धाड, आरोपींकडून बिबट्यांची नखे, मिशा, हाडे जप्त

बिबट्याचे कातडे मिळवण्यासाठी पोलिसांकडून शोध, संशयितांना ताब्यात घेण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय प्राणी अवयव तस्करीचा संशय, अमरावतीतून चालतो वन्यजीवांच्या विक्रीचा व्यापार
अमरावती /23 जुलै– चांदूर रेल्वे वनपरीक्षेत्रात दोन बिबट्यांची शॉक देऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणार्या दोघांना वाइल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो आणि स्थानिक वनविभाग अधिकार्यांच्या धडक कारवाईमुळे अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या वाइल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोला अमरावतीतून बिबट्याच्या अवयवांची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार, ब्युरोचे दोन अधिकारी अमरावतीत दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक वनविभागाच्या सहकार्याने चांदूर रेल्वे रोडवरील ’ग्रीन अर्थ असवाल्ड अॅन्ड पॉवर डांबर प्लान्ट, रत्नापूर या ठिकाणी रस्त्यामध्ये दोन व्यक्तींना अडवून त्यांची विचारपूस व झडती घेतली. त्यांच्याकडून 2 मृत बिबट्यांची हाडे, नखे, मिशा आणि चंदनाचे लाकूड आढळून आले. पुरण प्रल्हाद राठोड (रा. चिरोडी, वय 55 वर्षे) आणि प्रकाश किसन जाधव (रा. पाथरगाव, वय 31 वर्षे) अशी या आरोपींची नावे आहेत.
आज अमरावती न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 जुलैपर्यंत पीसीआर (पोलीस कोठडी रिमांड) मंजूर केला. अमरावतीमधून बिबट्याच्या अवयवांची विक्री होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, स्थानिक वनधिकार्यांना या बाबत फारशी माहिती नव्हती. आज केलेल्या कारवाईत चांदूर रेल्वे आरएफओ कु. शीतल घुटे, वनपाल चिरोडी ए.ए. वानखेडे, वनपाल चांदूर रेल्वे ए.आय. शेख व इतर वनधिकारी सहभागी झाले होते. सदर प्रकरणाचा तपास अमरावतीचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर., विभागीय वनधिकारी दक्षता कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक कॅम्प आणि वन्यजीव ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनात आजची कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रक वनधिकार्यांनी जारी केले. मुंबईच्या वाइल्ड लाईफ प्राईम कंट्रोल ब्युरोला अमरावतीत 2 बिबट्यांची शॉक देऊन हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. मात्र, अमरावतीच्या वनविभागाला 2 बिबट्यांची हत्या झाल्याची माहिती का नव्हती? हा प्रश्न विचारला जात आहे. आरोपीवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 (सुधारणा 2022) चे कलम 9, 39 (1), (र), (ल), (2), (3), 44 (1) (र) 48-, 50, 51, 52, भा.व.अ. 1927 चे कलम 26 (1), (व), (ष), 42(1), महाराष्ट्र वननियम 2014 चे नियम 31, 47, 82 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
बिबट्याचे कातडे कुठे?’
आज वनविभागाने केलेल्या कारवाईनंतर दोन बिबट्यांची शॉक देऊन हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, त्या मृत बिबट्यांची कातडी आजच्या कारवाईत सापडलेली नाहीत. याचा अर्थ असा की, कातडे विकणारे तस्कर वेगळे असून त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. बिबट्याच्या शरीराच्या अवयवांची खरेदी करणारे व्यापारी कोण आहेत, हाही कळीचा मुद्दा आहे. अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींचा 27 जुलैपर्यंत पीसीआर असून या दरम्यान बिबट्याचे कातडे कुठे आहे, याचा शोध लागण्याची शक्यता आहे.
बिबट्याला शॉक देऊन मारल्यास 7 वर्षे जेल
शेतकरी शेतातील पिकांना वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी बेकायदेशीरपणे विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडतात आणि त्यामध्ये अनेकदा जंगली प्राण्यांचा मृत्यू होतो. तसेच रानडुकरासारख्या प्राण्यांची शिकार करण्याकरिता अशा लावलेल्या विजेच्या तारांमध्ये बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी अडकतात आणि त्यांचा शॉक लागून मृत्यू होतो. भारतात बिबट हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेड्युल-1 मधील संरक्षण प्राणी आहे. बिबट्याला शॉक देऊन मारणे किंवा त्यासाठी विजेचा सापळा रचणे हा अत्यंत गंभीर आणि अजमीनपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.




