साथीच्या आजारांना रोखण्यासाठी महापालिकेची विशेष धडक मोहीम

शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश

अमरावती/22 जुलै : पावसाळा सुरू होताच शहरावर डेंग्यू, मलेरिया आणि चिकणगुनियासारख्या साथीच्या आजारांचे सावट पसरू नये, म्हणून अमरावती महानगरपालिका पूर्णपणे क्शन मोडवर आली आहे. पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव मोडीत काढण्यासाठी संपूर्ण अमरावती शहरात तातडीने औषध फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग) आणि डास निर्मूलनाची धडक मोहीम राबवण्याचे कडक आदेश महापालिकेने दिले आहेत.
मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात साथीचे रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरुमकर, नगरसेवक मिलिंद चिमोटे, डॉ. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पोहनकर यांच्यासह विविध विभागांचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेत शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून रोज नियमित औषध फवारणी व नियोजनबद्ध फॉगिंग केले जाईल. अगदी सुट्टीच्या दिवशी अन् रविवारीही हे काम अविरत सुरू राहणार आहे. साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या मारण्यासाठी विशेष तेल टाकले जाईल. तसेच आशा सेविका घरोघरी जाऊन कुलर, टाक्या व भांड्यांची तपासणी करतील. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ’कोरडा दिवस’ पाळावा आणि शौचालयाच्या पाईपवर जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनावरांचे शेणखत तातडीने न हटवणार्‍या पशुपालकांना नोटिसा धाडल्या जाणार असून मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सहकार्याने ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून अमरावती शहर पूर्णपणे रोगमुक्त ठेवावे, असे स्पष्ट आदेश या बैठकीत देण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button