आरटीओला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लाभले

तीन वर्षांपासून रिक्त असलेले पद भरले; नंदकिशोर काळे यांनी स्वीकारला पदभार

अमरावती/2 जुलै: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), अमरावती येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर नंदकिशोर काळे यांनी पदभार स्वीकारला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजावर अतिरिक्त ताण पडत होता.
आता या पदावर नियुक्ती झाल्याने प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असून नागरिकांच्या विविध प्रकरणांच्या निपटार्‍यातही सुलभता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.काळे हे पुणे येथून पदोन्नतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून अमरावती येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या रुजू होण्याच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय पेंढारकर, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. काळे यांचे स्वागत केले. उपस्थितांनी त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या अनुभवाचा लाभ अमरावती जिल्ह्यातील परिवहन प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला. आरटीओ कार्यालयातील दीर्घकाळ रिक्त असलेले हे पद भरल्यामुळे विभागातील प्रशासकीय समन्वय, अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवांना अधिक बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button