गंभीर गुन्ह्यात अडकलेले तलाठी ठाकरे निलंबित
चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यालय धामणगाव निश्चित

प्रशासकीय प्रतिमेसाठी जिल्हाधिकार्यांचा कठोर निर्णय\
अमरावती /2 जुलै– अत्याचार आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या विपुल भानुदास ठाकरे या तलाठ्यावर जिल्हा प्रशासनाने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. या गुन्ह्यामुळे महसूल विभागाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एक जुलै रोजी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विपुल ठाकरे याच्यावर अमरावतीच्या एका पीडित महिलेने 19 मे रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार गाडगे नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 376 (2) (एन), 323, 504 आणि 506 कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेला मारहाण करणे, धमकावणे आणि सातत्याने लैंगिक छळ करणे अशा गंभीर स्वरूपाचे आरोप ठाकरेवर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, विविध प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांवर यावरून जोरदार चर्चा रंगली होती. प्रशासकीय कामात असलेल्या व्यक्तीवर इतके गंभीर गुन्हे दाखल असल्याने, त्याने पदावर राहिल्यास साक्षी दारांवर दबाव येण्याची किंवा तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्व भूमीवर जिल्हा धिकार्यांनी त्याला नोटीस बजावली होती, मात्र त्याने कसलेही समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. अखेर महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीतील तरतुदीनुसार प्रशासनाने त्याला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
निलंबित तलाठ्यावर मुख्यालयी राहण्याची सक्ती- निलंबनाच्या कालावधीत विपुल ठाकरे याचे मुख्यालय धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. या काळात तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याने मुख्यालय सोडू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे. नियमानुसार त्याला निर्वाह भत्ता मिळेल, परंतु त्यासाठी त्याने इतर कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर अधिक कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




