प्रवीण पोटे, वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी फार्म उचलले

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 16 अर्जाची उचल

अमरावती/25 मे– स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केली आहे.
या घोषणेसोबतच अमरावतीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि अपक्षांनी तब्बल 16 नामनिर्देशन पत्रे खरेदी केली आहेत. यामध्ये माजी मंत्री प्रवीण रामचंद्र पोटे पाटील, अनुराधा प्रवीण पोटे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख या आघाडीच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या बड्या नेत्यांशिवाय योगेश गावंडे, संदीप मेश्राम, विनीत डोंगरदिवे आणि मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद सादिक यांनीही आपले अर्ज उचलले आहेत. आगामी 1 जूनच्या दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष निवडणूक कक्षात उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जून रोजी रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले असून मुख्य पक्षांनी अजूनही आपले पत्ते पूर्णपणे उघड केलेले नाहीत. या निवडणुकीत नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नवनिर्वाचित तसेच स्वीकृतनगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर आणि उपमहापौर आपले मत नोंदवणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवाराला अर्ज सादर करताना मतदार यादीतील 10 सदस्यांची सूचक म्हणून स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. यासोबतच उमेदवारांना नमुना 2-ई जोडणे आवश्यक असून, त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी, चल-अचल संपत्तीचे विवरण पत्र दंडाधिकारी किंवा सक्षम अधिकार्‍यांसमोर सादर करावे लागेल. अर्जातील कोणतीही जागा रिकामी ठेवता येणार नाही. उमेदवाराला राज्यातील कोणत्याही विधानसभा क्षेत्राचा मतदार असल्याचा प्रमाणित पुरावा, निवडणूक अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे आणि निवासस्थानाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे गरजेचे आहे. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तीन स्वतंत्र पथके आणि विविध विभागांसाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक कक्षाच्या 100 मीटर परिसरात केवळ तीन वाहनांना प्रवेश दिला जाईल आणि अर्ज भरताना उमेदवारासोबत फक्त पाच लोकांनाच आत जाण्याची परवानगी असेल. यावेळच्या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महानगरपालिकेतील 8 आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमधील 34 स्वीकृत नगरसेवकांनाही मतदानाचा हक्क मिळाला आहे. यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकूण मतदारांमध्ये 226 महिला आणि 227 पुरुष मतदार असून, मतदारांची ही समसमान संख्या पाहता यंदाची लढत अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय पक्षांच्या अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू झाले असून, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विविध पक्षांचे वरिष्ठ नेते याच आठवड्यात अमरावती दौर्‍यावर येण्याची दाट शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे अमरावतीमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मतदारांना आपल्या गळाला लावण्यासाठी नेत्यांची जोरदार फिल्डिंग सुरू झाली आहे.

पोटे 28 तारखेला भरणार अर्ज

माजी मंत्री आणि या मतदारसंघाचे सलग दोनदा प्रतिनिधित्व केलेले प्रवीण पोटे पाटील हे आगामी गुरुवार 28 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यांनी आधीच अर्जांचे 3 संच खरेदी केले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button