समन्वय, गतिमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत संवादावर भर
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी विभाग प्रमुखांची घेतली आढावा बैठक

अमरावती /2जुलै: अमरावती महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत शहराच्या विकासाचा कणा असलेल्या विविध कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईसह शहरातील रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात दुवा साधून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे ही महापालिकेची मुख्य जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी कामातील विलंब खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले. शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागातील नगरसेवकांशी सतत संपर्क ठेवून समन्वयाने काम करावे अशा कडक सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पारदर्शक कारभारासाठी आणि दर्जेदार नागरी सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक अधिकार्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी आवर्जून नमूद केले. या बैठकीत उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश माडीकर यांच्यासह सभागृह नेते चेतन गावंडे आणि गटनेते डॉ. राजेंद्र तायडे यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि शिल्पा नाईक यांच्यासह उपायुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे आणि भाग्यश्री बोरोकर यांनी आपापल्या विभागातील कामांचा अहवाल सादर केला. लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्राधान्य देऊन प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या अडचणींचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. आगामी काळात सर्व विभागांनी वेळेचे नियोजन करून कामांचा वेग वाढवावा आणि नागरिकांना भेडसावणार्या समस्या थेट मार्गी लावाव्यात असे आवाहन करत महापौरांनी या बैठकीत अधिकार्यांना धारेवर धरले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास शहराचा चेहरामोहरा लवकरच बदलेल असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.




