अमरावतीची ग्रामीण पोलीस वसाहत वर्षभरापासून ओस
लोकार्पणानंतरही पोलीस कर्मचार्यांची घरकुल प्रतीक्षा कायम

अमरावती /1 जुलै- काटेल रोडवरील एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस विभागाच्या 208 पोलीस निवासस्थानांचे लोकार्पण होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप एकाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचार्याचे कुटुंब येथे वास्तव्यास आलेले नाही. 127 पोलिसांना घरे वाटप होऊनही वसाहत ओस पडली असून, हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
गृह विभागाच्या निधीतून उभारलेल्या या आधुनिक वसाहतीत वीज आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या परिसराचे महत्त्व लक्षात घेता, येथे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे बांधकामही सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यापासून या वसाहतीची चार वेळा पाहणी केली आहे. या आवारात अमली पदार्थ विरोधी पथकाचे कार्यालय कार्यान्वित असून, ग्रामीण पोलीस दलाचे तीन प्रशिक्षण कार्यक्रम सध्या येथेच राबवले जात आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल 2025 मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या कार्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निवासस्थानांचे लोकार्पण सोहळा पार पडला होता. अमरावती शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या वसाहतीकडे ग्रामीण पोलीस दलासाठी एक वरदान म्हणून पाहिले जात होते. वसाहतीतील 127 जणांना घरांचे वाटपही करण्यात आले आहे. असे असतानाही, आजवर एकही कुटुंब आपल्या नवीन घरात राहायला पोहोचलेले नाही. यामुळे ही वसाहत नक्की कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या परिवारासह येथे स्थायिक होतील, तेव्हाच या वसाहतीला खर्या अर्थाने घरपण मिळेल. आता या निवासस्थानांचा प्रत्यक्ष ताबा पोलीस कुटुंब कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




