राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
24 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

मुंबई/1 जुलै -राज्यभरात मान्सूनने चांगलाच जोर धरला असून नागरिकांसह शेतकर्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्टजारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.




