शाळा सुरू: साहित्यासाठी पालकांची प्रचंड गर्दी

शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात लगबग

* बदललेल्या अभ्यासक्रमामुळे पालकांच्या खिशाला कात्री

अमरावती /30 जून- शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची पुस्तके, गणवेश, रेनकोट व इतर शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात प्रचंड धावपळ उडालेली पाहायला मिळाली. सोमवारपासून सर्व शाळा सुरू झाल्या असून, बाजारपेठेत पालकांची मुलांसह मोठी गर्दी झाली होती. मुलांच्या शाळेसाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये पालकांची एकच झुंबड उडाली होती, ज्यामुळे दुकानदारांना ग्राहकांशी बोलण्यासही उसंत नव्हती.
यावर्षी काही इयत्तांचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे पालकांना नवीन पुस्तके खरेदी करावी लागत आहेत. यासोबतच शाळेचा गणवेश, रेनकोट, छत्र्या, बूट, मोजे, टाय, बेल्ट व टिफिन बॅग अशा वस्तू खरेदी करण्यात पालक मग्न आहेत. सीबीएसई शाळांमध्ये पुस्तकांचा खर्च 2500 ते 3500 रुपयांपर्यंत वाढला आहे, तर स्टेट बोर्डाचा खर्चही 700 ते 800 रुपयांपर्यंत वाढला आहे. यावर्षी स्टेट बोर्डाने इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल केल्यामुळे गेल्या वर्षीची पुस्तके आता विद्यार्थ्यांच्या उपयोगाला येणार नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी काही पुस्तके कमी असल्यास ती बाजारातून खरेदी करावी लागतात, म्हणूनच स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचे सेट येथे उपलब्ध केले आहेत. बाजारात रेनकोट आणि छत्र्या 150 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, तर मुलांचे रेनकोट 1500 रुपयांपर्यंत आहेत. मोची गल्ली मध्ये बूटही 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीत मिळत आहेत. एकूणच शाळा सुरू होणे पालकांसाठी धावपळीचे ठरत आहे. सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या पुस्तकांच्या किमती 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मात्र, वह्या आणि रजिस्टरचा खर्च काहीसा कमी झाला आहे. पूर्वी वह्यांवर 18 टक्के जीएसटी लागत होता, परंतु आता नवीन स्लॅबनुसार तो 12 टक्के झाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. सध्या वह्या 500 ते 630 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button