विकास विभागाच्या अभ्यासिकेसाठी भाडे अदा केल्याने शासनाचे नुकसान
अमरावती येथे शासकीय इमारत तयार असतांना आदिवासी

आ.सुलभा खोडके यांची लक्षवेधी
अमरावती/25 जून – अमरावती शहरातील गडगे नगर परिसरात आदिवासी विकास विभागाची स्वतःची हक्काची आणि सुसज्ज इमारत उभी असतानाही काही अधिकार्यांनी राजकमल चौकातील खाजगी गाळ्याचे अवास्तव भाडे भरून सरकारी पैशाची लूट केली आहे. गेल्या चौदा महिन्यांत चक्क एक कोटी बारा लाख रुपयांचा चुराडा करून या अधिकार्यांनी गरिबांच्या कल्याणासाठी असलेला निधी स्वतःच्या फायद्यासाठी उधळला. या गंभीर भ्रष्टाचाराची प्रकरणे आमदार सुलभाताई खोडके यांनी विधिमंडळात धसास लावली. केवळ पाच ते दहा टक्के उपस्थिती असतानाही 31 मार्च 2028 पर्यंतचा दीर्घकालीन करार करून कशाच्या आधारे हा अवाढव्य खर्च केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वित्त विभागाचे नियम पायदळी तुडवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला बगल दिली गेली. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्रयस्थ यंत्रणेकडून भाडे निश्चितीचा अहवाल तयार करून एक प्रकारे सरकारी तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम या अधिकार्यांनी केले आहे. या प्रकाराची दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सभागृहात या सर्व प्रकरणातील 100 टक्के अनियमितता मान्य केली आहे. 11 मे 2026 रोजी गठित केलेल्या चौकशी समितीने 29 मे 2026 रोजी सादर केलेल्या अहवालात सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. या घोटाळ्यामुळे आदिवासी वसतिगृहाच्या गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. यापुढे कोणताही अधिकारी अशा कामात दोषी आढळल्यास त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशाराही मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला आहे. अशा लबाडीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार असणार्यांची गय केली जाणार नाही अशी संतप्त भावना परिसरात व्यक्त होत आहे.
आदिवासी विकास विभागाने स्वतःची इमारत असताना देखील खाजगी जागेसाठी एक कोटी 12 लाखांचे भाडे भरले. यात 100 टक्के अनियमितता झाल्याचे चौकशीत समोर आल्यावर आता गृहप्रमुख आणि गृहपालावर निलंबनाची कारवाई झाली आहे.




