लैंगिक शोषणातून गर्भधारणेनंतर बालिकेचा मृत्यू
नागपुरात सुरु होते उपचार

-धारणीच्या जुटपाणी गावातील घटना
धारणी/ 23 जून : धारणी तालुक्यातील जुटपाणी गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यावर एका युवकाने तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. दरम्यान प्रसूतीसाठी भरती करण्यात आल्यानंतर तिला सिकलसेलचे निदान करण्यात आले. नागपूर येथे उपचार सुरु असताना या बालिकेचा मृत्यु झाला. या घटनेमुळे धारणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणार्या युवकाविरुद्ध धारणी पोलिसात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन धारणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अनिल रतीलाल जांभेकर (21, जुटपणी) असे आरोपीचे नाव आहे.
मेळघाटात बालविवाह आणि कुमारी मातेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग, उन्नती संस्था व अनुसंधान ट्रस्ट संस्थेकडून बालविवाह प्रतिबंधासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात तरी धारणी व चिखलदरा भागात बालविवाह होतच असतात. धारणीपासून 10 कि. मी. अंतरावरील जुटपाणी गावातील 17 वर्ष वयाच्या एका मुलीला फुस लावून अनिल जांभेकर याने पळविले आणि वर्षभर वारंवार बलात्कार केला. काही महिने अनिलने मुलीस घरातच ठेवलेले होते. मुलीस गर्भधारणा झाल्याने तिने उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखविले म्हणून गर्भधारणा झाल्याचे समजले व प्रकरण बाहेर आले. मुलीस तीव्र सिकलसेल असल्याने तात्काळ नागपूर पाठविण्यात आले. मुलीच्या आईने धारणी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर वर्षभर शोषण आणि वारंवार शारिरीक उपभोगाची माहिती समोर आली.
पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी कलम 46 (बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा) तथा 137 (2), 64 (2)(1), 64 (2)(एम) बीएनएस अन्वये गुन्हा कायम करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सोळंके व हे. काँ. वसंत चव्हाण करत आहेत. नागपूर येथे सिकलसेल आणि अप्राकृतिक गर्भधारणेचे उपचार सुरू असताना पिडीता मरण पावली. या घटनेमुळे कमी वयात लग्न किंवा भागाभागीचे प्रकरणाचा अंत अत्यंत दुर्दैवी व गंभीर होत असते, हे उजेडात आलेले आहे. या घटनेमुळे धारणी परिसरात एकच खळबळ माजलेली आहे.




