पहिल्याच पावसाने चांगापूर पूल ‘जॅम’ वाहतूक ठप्प

रेल्वे अंडरपासच्या कामातील निष्काळजीने ग्रामस्थांची कोंडी

प्रशासनाच्या पोकळ दाव्यांची पावसामुळे उघडली पोलखोल

अमरावती/24 जून – अमरावती-चांगापूर मार्गावरील रेल्वे अंडरपासच्या कामात झालेला निकृष्ट दर्जा आणि नियोजनाचा अभाव पहिल्याच पावसात चव्हाट्यावर आला आहे. पावसाच्या सुरुवातीच्याच सरींनी या अंडरपासमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने, अमरावती आणि चांगापूर या दोन्ही ठिकाणचा संपर्क रात्रभर पूर्णपणे तुटला होता. पावसाळ्यापूर्वीच या कामाबद्दल स्थानिकांनी आणि ‘आपली मातृभूमी’ या वृत्तपत्राने संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून धोक्याचा इशारा दिला होता, मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. खा. डॉ. अनिल बोंडे यांना प्रत्यक्ष घटनास्थळावर पाचारण करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी सुरळीत वाहतुकीची ग्वाही दिली होती, परंतु मंगळवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात या सर्व आश्वासनांचा फज्जा उडाला. रात्रीपासूनच अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आणि नोकरी-व्यवसायासाठी जाणार्‍या नागरिकांसह ग्रामस्थांचे मोठे हाल झाले.
अनेकांना भर पावसात मार्ग बदलून परत फिरावे लागले. बुधवार सकाळच्या सुमारास प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोटार पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम सुरू केले, परंतु हा उपाय तात्पुरता असून, कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या मार्गाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. अंडरपासमध्ये उच्च क्षमतेची पंपिंग यंत्रणा आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज लाईन उभारणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी

चांगापूर रेल्वे अंडरपासच्या निर्मितीमधील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या डिझाइनमुळे नागरिकांना दरवर्षी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जामुळे विकासाच्या कामाचा मूळ उद्देशच हरवला असून, गावाचा मुख्य मार्ग पावसाळ्यात बंद पडणे दुर्दैवी आहे. प्रशासनाने आता तरी जबाबदारी निश्चित करून पावसाळी पाणी निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक अधिक तीव्र होईल.

संबंधित बातम्या

Back to top button