रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती आता महारेलकडे
अमरावती रेल्वे उड्डाणपुलासाठी सव्वाशे कोटी मंजूर

राजकमल ते जयस्तंभ मार्गावरील नव्या कामाला गती
अमरावती/23 जून– शहरातील वाहतुकीचा मुख्य भार सांभाळणार्या राजकमल चौक ते हमलापूर मार्ग आणि जयस्तंभ रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी आता महारेल कंपनीकडे सोपवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महारेलकडे हे काम गेल्यामुळे शहरातील जुनाट वाहतूक समस्येतून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे.
या भव्य पुलाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून 125 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल अधिकृतपणे हस्तांतरित होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. आता चौक ते रेल्वे स्थानकाकडे जाणार्या मार्गावरील सर्व कामे महारेलच्या माध्यमातूनच पूर्ण केली जातील, अशी महत्त्वाची माहिती महारेलचे महाव्यवस्थापक संग्राम पाटील यांनी दिली आहे. शहराच्या मध्यभागात असलेला हा जुना रेल्वे पूल 25 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. या पुलाच्या निर्माण कार्याला मोठी गती मिळावी यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुलाचा जुना सांगाडा पाडण्याचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून त्याचे लोखंडी गर्डर काढण्यात आले आहेत. आता लवकरच पुलाचे जुने दगडी खांब हटवून नव्या रचनेनुसार आधुनिक खांब बसवण्याच्या कामाला वेग दिला जाईल. अत्यंत भव्य आणि प्रशस्त असणार्या या नवीन उड्डाणपुलाचे काम पुढील 2 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.महारेलमुळे वाहतूक कोंडीतून कायमची सुटका-रेल्वे उड्डाणपुलाचे काम महारेल कंपनीकडे गेल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची मिटणार आहे. केंद्र सरकारच्या 125 कोटींच्या निधीतून जुने दगडी खांब हटवून आधुनिक पद्धतीचा प्रशस्त पूल उभारला जाणार असून दोन वर्षात हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज होईल.




