केवायसी त्रुटीमुळे 62 हजार लाडक्या बहीणी योजनेतून बाहेर
अटींच्या जाचक नियमांमुळे हजारो महिला वंचित

अमरावती/22 जून- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात हजारो महिलांना विविध तांत्रिक कारणांमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. केवायसी न करणे अथवा केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे तब्बल 61 हजार 982 महिलांची नावे योजनेतून बाहेर करण्यात आली असून, एकूण 22 हजार 229 अर्ज कायमस्वरूपी नाकारण्यात आले आहेत. याशिवाय, विविध अटींमुळे हजारो महिला लाभापासून वंचित राहिल्या असून, त्यांची योग्य यादी महिला व बालकल्याण विभागाकडे उपलब्ध नसल्याने अनेक महिला संबंधित शासकीय कार्यालयाचे चकरा मारत आहेत. राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अमरावती जिल्ह्यात एकूण 7 लाख 20 हजार 665 अर्ज प्राप्त झाले होते, ज्यातील 6 लाख 95 हजार 350 अर्ज मंजूर झाले तर 22 हजार 229 अर्ज कायम स्वरूपी नाकारण्यात आले. वयाच्या अटीमुळे 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 1 हजार 472 आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5 हजार 386 महिलांची नावे वगळली असून, 1 हजार 762 महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, घरात चारचाकी वाहन असल्यामुळे 4 हजार 405 महिलांचा लाभ नाकारला असून बँक खात्याशी मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने 3 हजार 750 महिलांची नावे कमी केली आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्याने 778 महिलांची डीबीटी रोखली आहे. शासनाने केवायसीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत वेळ दिली होती, पण ती पूर्ण न केल्याने आणि तांत्रिक चुकांमुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिला वंचित राहिल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.




