अमरावती विधान परिषद निवडणूक काँग्रेसमध्ये गोंधळ; नगरसेवक संभ्रमित
आज अमरावतीच्या नगरसेवकांची बैठक, प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

हर्षजीत प्रकरण संपले, वंचितला पाठींबा की अंतरआत्म्याच्या आवाजाने मतदान ?
अमरावती /16 जून– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोणती भूमिका घ्यावी, याचा निर्णय बुधवारी दुपारपर्यंत प्रदेशाध्यक्ष देतील आणि त्यानुसार मतदान होईल अशी भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज जाहीर केली.
खा. बळवंत वानखडे यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांचा विषय संपल्यामुळे मतदान कोणाला करायचे, हा प्रश्न पक्षासमोर उभा असून, यासंदर्भात गटनेत्यांशी आज चर्चा करण्यात आली. बैठकीला खासदार बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आ. डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते बबलू देशमुख यांच्यासह नगरपालिकेचे गटनेते उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बबलू देशमुख यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत गटनेत्यांची मते जाणून घेतली आहेत. काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारल्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. वंचितचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबत नगरसेवकांमध्ये दोन मते आहेत, याचे बबलू देशमुख यांनी खंडन केले. आजच्या चर्चेचा अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सादर केला जाईल आणि त्यानंतर उद्या सकाळपर्यंत प्रदेशाध्यक्ष निर्णय देतील व त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले की, हर्षजीत देशमुख हा अॅटम काँग्रेससाठी संपला आहे. त्यांची उमेदवारी आता आम्ही गांभीर्याने घेत नाही. उद्या अमरावती महानगरपालिकेच्या नगरसेवकांशी आम्ही चर्चा करू. काँग्रेस नेत्यांच्या आजच्या बैठकीवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरवताना एकाही नगरसेवकाला विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेतली नाहीत. तसेच ही निवडणूक पैशांची असून मतदार विकले जात आहेत, अशी टीका सातत्याने काँग्रेस नेत्यांकडून माध्यमाकडे होत होती. काँग्रेस उमेदवार कोण असावा, याबाबत नगरसेवकांना आपली मते मांडण्याची कुठेही संधी देण्यात आली नाही. तसेच निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना आता नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. एका बाजूला ज्या उमेदवाराची काँग्रेसने निवड केली होती, त्यानेच पक्षाच्या नेत्यांची निंदा- नालस्ती सुरू केली असून पक्षासाठी तो विषय संपला असला तरी, या निवडणुकीला ’घोडाबाजार’ समजून नगरसेवकांना गृहीत धरण्यात आले होते का? असा प्रश्नही विचारला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगरसेवकच मतदार असताना त्यांची मते, भूमिका आणि परिस्थितीवर आजवर एकदाही काँग्रेस नेत्यांना नगरसेवकांशी संवाद साधण्याची गरज पडू नये, याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे. आत मात्र नगरसेवकांना काँग्रेस नेते नगरसेवकांच्या बैठकीचे सत्र घेत आहेत. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. मतदान कोणाला करायचे याबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय देतील. मात्र वास्तविकरीत्या पक्षासमोर प्रचंड गोंधळ निर्माण होतांना नगरसेवकांना कधीच कोणी का विचारलं नाही असा प्रश्न विचारल्या जात आहे.




