पहिल्याच पावसात महावितरणच्या मीटर पेट्यांचा बोजवारा
निकृष्ट कामातून भ्रष्टाचार उघड

अमरावती /8 जून: महावितरणकडून शहर व ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या वीज मीटर पेट्यांची पहिल्याच पावसाळी वादळात दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खांबांवर बसविण्यात आलेल्या अनेक पांढर्या रंगाच्या मीटर पेट्या तुटून पडल्याचे चित्र समोर आले असून, यामागे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी केला आहे. ग्रामीण भागासह शहरांमध्ये ग्राहकांच्या घरांतील वीज मीटर विनाकारण बाहेर काढून खांबांवर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी लाखो रुपयांच्या निधीतून निकृष्ट दर्जाच्या पेट्या बसविण्यात आल्या. मात्र पहिल्याच पावसात आणि वादळात या पेट्यांची अवस्था दयनीय झाली असून अनेक ठिकाणी त्या तुटल्या, फुटल्या आणि काही खांबांवरून खाली कोसळल्या आहेत.यापूर्वी सुमारे पाच वर्षांपूर्वी लाल रंगाच्या पेट्या उभारण्यात आल्या होत्या. त्या पेट्यांमध्ये आजतागायत अनेक ठिकाणी कोणतीही जोडणी करण्यात आलेली नाही. परिणामी त्या पेट्या रस्त्याच्या कडेला उभ्याच राहून गंजून व सडून निकामी झाल्या आहेत. त्या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याचे हटवार यांनी म्हटले आहे. ग्राहकांकडून विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते, मात्र त्याच्या बदल्यात दर्जेदार सुविधा देण्याऐवजी निकृष्ट कामांवर खर्च करून अधिकार्यांकडून भ्रष्टाचार केला जात आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय करून ठेकेदार आणि अधिकारी यांचे हित साधले जात असल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला. पहिल्याच पावसात कोसळलेल्या मीटर पेट्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कामांची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नितीन हटवार यांनी केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी व्हावी – नितीन हटवार
महावितरणने उभारलेल्या मीटर पेट्या पहिल्याच पावसात तुटून पडणे ही गंभीर बाब असून यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय करून झालेल्या या कामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी. संबंधित अधिकारी, ठेकेदार व कामाची मंजुरी देणार्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) अमरावती तालुकाध्यक्ष नितीन हटवार यांनी केली आहे




