पर्यावरण संवर्धनासाठी 31 हजार वृक्षारोपणाचा महासंकल्प

जिल्हा ग्रामीण भाजपचा पुढाकार

अमरावती /7 जून – पर्यावरण संवर्धन आणि हरित अमरावतीच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत येत्या 20 तारखेपर्यंत जिल्हाभरात तब्बल 31 हजार वृक्षांची लागवड करण्याचा महासंकल्प भाजप जिल्हा ग्रामीणने केला आहे. या अभियानाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप अमरावती जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी भूषविले, तर आमदार प्रतापदादा अडसड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांच्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक आणि स्थानिक हवामानास अनुकूल वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते तापमान, पर्यावरणीय असंतुलन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितले की, वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे. 31 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाभर सक्रियपणे कार्यरत राहतील. आ.प्रतापदादा अडसड यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यावर भर देत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वृक्षारोपण अभियानामुळे अमरावती जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भाजप जिल्हा ग्रामीणचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button