शरद पवारांची नरेंद्र मोदींसोबत बैठक

एनडीएमध्ये सहभागाच्या चर्चांना पुन्हा जोर, भेटीचं कारण गुलदस्त्यात

नवी दिल्ली/22 जुलै  : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा असतानाच राष्ट्रीय स्तरावर मोठी घडामोड घडल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याची किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच मोदी-पवार भेट झाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे फोटो ’एक्स’ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पवारांचा हात पकडून मोदी हसतमुखाने त्यांना आत आपल्या चेंबरमध्ये नेताना पाहायला मिळतात. या हायप्रोफाईल भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, परंतु कॉक्रोचजनता पार्टीच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलन सुरु असतानाच झालेल्या पवार-मोदी भेटीच्या टायमिंगची चर्चा सुरु झाली आहे. नीट पेपरफुटीसह शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभाराचा आरोप करत विरोधी पक्ष नेते आणि अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरुन युवा वर्गाने देशव्यापी आंदोलन छेडले असून त्याला वाढता पाठिंबा पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button