पेट्रोल, डिझेल, गॅस दर कमी करण्याबाबत योग्यवेळी निर्णय

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

नागपूर /7 जून : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवे दर हे आजपासून अर्थात 7 जूनपासून लागू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असल्याने घरगुती बजेटवरील ताण आणखी वाढणार आहे. मात्र, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही केंद्र सरकारने दर कमी केल्याचा दावा करीत योग्यवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नमुद केले.
नागपुरातील रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, युद्धजन्य स्थितीमुळे जगात सर्वच देशांमध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढले आहे. परंतु केंद्र सरकार काळजी घेत आहे. परिस्थिती निवळल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅसची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असेल, त्यावेळी वाढलेल्या किमती कमी होतील. केंद्र सरकार याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अल्पावधीतच सिलिंडर 89 रुपयांनी महागला आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होणार आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणार्‍या कुटुंबांना आता स्वयंपाकघराचा खर्च अधिक मोजावा लागणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियातील तणाव, ऊर्जा पुरवठ्यावर निर्माण झालेले दबाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढते इंधनदर यामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाचे प्रमाणयंदा सरासरी 92 टक्के असून मराठवाड्यासह कमी पाऊस पडणार्‍या भागातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ येणार नाही, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकर्‍यांचे कमीत कमी नुकसान होईल, असा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्यात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग’ अशी मोहिम सुरू आहे. कुठल्याही स्थितीत ड्रग्सविक्रीचे पाळेमुळे खोदून काढण्याचा संकल्प केला आहे. पुढचे काही दिवस ही कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button